तुम्ही कुठल्याही देशाचे असा, तुमचे झेंडे वेगवेगळे असतीलही, पण प्रेम, जीवन आणि विश्व एक आणि एकच, अशा आशयाच्या आणि आत्तापर्यंत क्रीडा विश्वाला ठेका धरायला लागवणाऱ्या ‘वुई आर वन.. ओले, ओले, ओले, ओला’ हे फुटबॉल विश्वचषकाचे शीर्षकगीत यंदाच्या लज्जतदार उद्घाटन सोहळ्याचे आकर्षण ठरणार आहे. अभिनेत्री आणि गायिका जेनिफर लोपेझ आणि गायक पिटबुल हे दोघेही हे शीर्षकगीत सादर करणार आहेत.
गेल्या आठवडय़ामध्ये लोपेझ विश्वचषकाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागी होणार नसल्याचे वृत्त आले असले तरी आयोजकांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. ‘जेनिफरला कार्यक्रमामध्ये शीर्षकगीत सादर करायचे आहे,’ अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. त्यामुळे लोपेझच्या मादक अदांवर घायाळ होण्याबरोबर थिरकण्यासाठी चाहते सज्ज झाले आहेत. चार वर्षांनी रंगणाऱ्या फुटबॉलच्या कुंभमेळ्याचा दिमाखदार उद्घाटन सोहळ्यामध्ये ब्राझीलमधील विविधता आणि सुंदर गोष्टींचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे. या विश्वचषकाचे वेगळेपण म्हणजे, या विश्वचषकाची सुरुवात बहुविकलांग व्यक्ती फुटबॉलला किक मारून करणार आहे.

Story img Loader