ब्राझील या दक्षिण अमेरिकेतील प्रमुख संघात आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडणारे अनेक मातब्बर खेळाडू आहेत. त्यांचा खेळ पाहण्यासाठी आणि विजयानंतर सांबा नृत्य करण्यासाठी फुटबॉलप्रेमी आतुर असतात. मात्र अशा या ब्राझील संघासाठी पुढील फेरी गाठणे तितके सोपे नाही. ई-गटाला खडतर गट असे म्हणायला हरकत नाही. या गटात स्वित्र्झलड व सर्बिया हे दोन युरोपीय संघ आणि मध्य अमेरिकेतील कोस्टारिका असे अनपेक्षित निकाल नोंदवणारे संघ आहेत. कोस्टा रिकाने २०१४च्या स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी करत फुटबॉलविश्वाला थक्क केले होते.

गट

ब्राझील

जा गतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला हा संघ जेतेपदाच्या शर्यतीत नेहमी आघाडीवर असतो. १९९० नंतरच्या प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत या संघाने उपांत्यपूर्व फेरीत सहज प्रवेश केलेला आहे. त्यात १९९४ व २००२ मध्ये त्यांनी जेतेपद पटकावले आहे आणि १९९८ मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र २०१४ मध्ये जर्मनीकडून झालेला (७-१) मानहानीकारक पराभव त्यांच्या अद्याप जिव्हारी लागलेला आहे. त्यामुळे यंदा या पराभवाच्या परतफेडीसह जेतेपद त्यांना खुणावत आहे. नेयमार हा त्यांचा प्रमुख खेळाडू आहे, परंतु त्याच्या तंदुरुस्तीबाबत हमी देणे अवघड आहे. त्याच्या साथीला आघाडीची जबाबदारी पेलण्यास गॅब्रियल जीजस समर्थ आहे. मधल्या फळीत फिलिप कुटिन्हो, पॉलिन्हो, सॅसेमिरो, विलियन, रेनाटो ऑगस्टो, डोग्लास कोस्टा आणि फर्नाडोन्हो हे एकाहून एक सरस खेळाडू आहेत. बचावफळीही तितकीच प्रभावशाली आहे. मार्सेलो, फिलिप लुइस, थिएगो सिल्व्हा, माक्र्युन्होस आणि मिरांडा हे प्रमुख अस्त्र ठरू शकतात. डॅनी अल्व्हेसची अनुपस्थिती ब्राझिलला जाणवू शकते.

  • जागतिक क्रमवारी : २
  • पात्र : दक्षिण अमेरिका गटात अव्वल
  • प्रशिक्षक : डेनोर बॅच्ची
  • २०१४च्या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी : चौथ्या स्थानावर समाधान
  • संभाव्य व्यूहरचना : ४-३-३ किंवा ४-१-४-१

स्वित्र्झलड

जा गतिक क्रमवारीत स्वित्र्झलड हा फ्रान्स, स्पेन, चिली, इंग्लंड, कोलंबिया, उरुग्वे, आदी प्रमुख देशांच्या पुढे आहे. हे आश्चर्यकारक असले तरी सत्य आहे. याही संघात गुणवत्ता ठासून भरलेली आहे. मात्र या वेळी त्यांना २०१४ची विश्वचषक स्पर्धा आणि २०१६च्या युरो स्पर्धेपेक्षा अवघड आव्हान आहे. गोलरक्षक यान सोमर हा त्यांचा चेहरा. मध्य बचावफळीत फॅबियन स्चर, जोहान ड्जोरोयू, रिकाडरे रॉड्रिगेझ आणि स्टीफन लिश्टेनर ही फळी आहेच. झेर्दान शकिरी हा त्यांचा ‘ट्रम्प कार्ड’ ठरू शकतो. शकिरीने ६८ सामन्यांत २० गोल केले असून १८ गोलसाठी साहाय्य केले आहे.

  • जागतिक क्रमवारी : ६
  • पात्र : युरोपियन बाद फेरीच्या लढतीत उत्तर आर्यलडवर विजय.
  • प्रशिक्षक : व्लादिमिर पेटकोव्हिक
  • २०१४च्या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी : उपउपांत्यपूर्व फेरीत अर्जेटिनाकडून पराभूत
  • संभाव्य व्यूहरचना : ४-२-३-१

कोस्टारिका

ब्रा झीलमधील विश्वचषक स्पर्धा ही कोस्टारिकासाठी अविस्मरणीय ठरली. उरुग्वेला पिछाडीवर टाकून गटात अव्वल स्थान घेतले. इटली आणि इंग्लंडसारखे संघ फेव्हरेट असताना कोस्टारिकाने घेतलेली ही गरुडझेप होती. उपउपांत्यपूर्व फेरीत त्यांनी ग्रीसला कडवे आव्हान दिले, तर उपांत्यपूर्व फेरीत बाद होण्यापूर्वी नेदरलॅण्ड्सला झुंजवले. किलर नव्हास याबद्दल अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. रेयाल माद्रिदच्या या गोलरक्षकाने नुकताच सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स चषक उंचावला आहे. ब्रायनो ऑव्हिडो, सेल्सो बोर्जेस, ब्रायन रुइझ आणि जोएल कॅम्पबेल ही फळी कोस्टारिकासाठी फायद्याची आहे. कोस्टारिकाकडे दुर्लक्ष करून चालणारे नसले तरी त्यांच्याकडून फार अपेक्षा ठेवणेही चुकीचे आहे.

  • जागतिक क्रमवारी : २५
  • पात्र : मध्य अमेरिका गटात दुसरे स्थान
  • प्रशिक्षक : ऑस्कर रॅमीरेझ
  • २०१४च्या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी : उपांत्यपूर्व फेरीत नेदरलॅण्ड्सकडून पराभूत
  • संभाव्य व्यूहरचना : ५-४-१

सर्बिया

स र्बियाला १९९८ नंतर गटसाखळीचा अडथळा एकदाही पार करता आलेला नाही. प्रशिक्षक स्लॅव्होल्जूब मुस्लीन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्बियाने विश्वचषकात स्थान मिळवले. मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे नवीन प्रशिक्षक मॅल्डेन क्रेस्टॅडिक यांना संघाला मार्गदर्शन करण्यासाठी फार कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे संघाची कामगिरी कशी होते हे पाहणे उत्सुकतेचे आहे. पात्रता फेरीत हा संघ १० सामन्यांत एकदाच पराभूत झाला आहे. गोलरक्षक व्लादिमिर स्टोज्कोव्हिक, मध्यरक्षक नेमांजा मॅटिक हे प्रभाव पाडणारे खेळाडू त्यांच्याकडे आहेत.

  • जागतिक क्रमवारी : ३५
  • पात्र : वेल्स, ऑस्ट्रिया, जॉर्जिया आणि मोल्दोव्हा यांच्या गटात अव्वल स्थान.
  • प्रशिक्षक : मॅल्डेन क्रेस्टॅडिक
  • २०१४च्या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी : पात्र ठरण्यात अपयशी. २०१० नंतर प्रथमच पात्र
  • संभाव्य व्यूहरचना : ४-१-४-१, ४-२-३-१ किंवा ४-३-३.

Story img Loader