दोहा : उत्तरार्धात मध्यरक्षक मॅथ्यू लेकीने केलेल्या गोलच्या बळावर ऑस्ट्रेलियाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील ड-गटाच्या अखेरच्या साखळी सामन्यात डेन्मार्कला १-० असा पराभवाचा धक्का दिला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने केवळ दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश मिळवला.
स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा होता. त्यामुळे दोन्ही संघांनी बचावावर अधिक भर दिला. डेन्मार्कला
चेंडूवर अधिक वेळ नियंत्रण मिळवण्यात यश आले. तसेच त्यांनी गोलच्या दिशेने १३ फटकेही मारले. मात्र, त्यांना एकही गोल करता आला नाही. याऊलट ऑस्ट्रेलियाचा भक्कम बचाव करतानाच चेंडू मिळताच प्रतिआक्रमण करण्याचा प्रयत्न होता. अखेर त्यांना ६०व्या मिनिटाला गोल करण्यात यश आले. लेकीने अप्रतिम वैयक्तिक गोल करत ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. अखेर ही आघाडी निर्णायक ठरली.
ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच्या सामन्यात टय़ुनिशियाचा पराभव केला होता. विश्वचषकात सलग दोन सामने जिंकण्याची ही त्यांची दुसरीच वेळ ठरली. या कामगिरीमुळे त्यांना १६ वर्षांच्या कालावधीनंतर विश्वचषकाची बाद फेरी गाठण्यात यश आले.