फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामना हा काही तासांवर येऊन ठेपला आहे. या जागतिक फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात होणार आहे. हा सामना १८ डिसेंबर रोजी लुसेल स्टेडियमवर होणार आहे. पण त्यादरम्यान, लिओनेल मेस्सी जखमी झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे. क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात मेस्सीला हॅमस्ट्रिंगची त्रास जाणवताना दिसत आहे. अर्जेंटिनाचा हा सुपरस्टार गुरुवारी प्रशिक्षणासाठी मैदानावरही उतरला नाही. आता मेस्सी अंतिम सामन्यातही दिसणार नाही का?, अशी भीती चाहत्यांना वाटू लागली आहे.
फिफा विश्वचषकात मंगळवारी झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने क्रोएशियावर ३-० असा विजय नोंदवला. या सामन्यादरम्यान, ३५ वर्षीय मेस्सी अनेक वेळा त्याच्या हॅमस्ट्रिंगला पकडताना दिसला. सामन्यादरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी त्याने संघासोबत सराव केला नाही. त्याच्याशिवाय इतर अनेक प्रमुख खेळाडूंनाही विश्रांती देण्यात आली आहे. फूट मर्काटो वेबसाइटनुसार, मेस्सीला त्याच्या हॅमस्ट्रिंगमध्ये समस्या येत आहेत.
फूट मर्काटोच्या रिपोर्टनुसार, मेस्सीला हॅमस्ट्रिंगमध्ये त्रास होत आहे. त्याची अंतिम फेरीतून बाहेर पडण्याची शक्यता नसल्याचं न्यूज प्लॅटफॉर्मने सांगितलं असलं तरी चाहते मात्र घाबरले आहेत. या अहवालाचा हवाला देत काही युजर्सनी लिहिले की, मेस्सी जर फायनलमध्ये खेळला नाही तर फायनलचा रोमांच कमी होईल.
मेस्सीच्या पायाचे स्नायू सुजले होते. यामुळे तो या सरावावेळी अनुपस्थित होता. मात्र, पीएसजीने एक निवेदन जारी करून मेस्सीची दुखापत गंभीर नसल्याचे म्हटले आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी तो आपल्या संघासाठी शेवटचा सामना खेळू शकतो. मेस्सी १८ डिसेंबरला फ्रान्सविरुद्धच्या सामन्यात खेळू शकतो. मात्र, दुखापत आणखी गंभीर रूप धारण करू नये यासाठी मेस्सी सध्या उपचार घेत असून लवकरच सराव सुरू करेल अशी माहिती समोर येत आहे.
मेस्सीपूर्वी डी मारिया आणि डिबेला यांनाही दुखापत झाली आहे. अशा स्थितीत अर्जेंटिनाचा संघ फिफा विश्वचषकात अडचणीत येऊ शकतो. मात्र संघ व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे तिघेही अंतिम सामन्यात मैदानात उतरतील अशी खात्री त्यांनी दिली आहे. असं असल तरी देखील ही संघासाठी मोठी चिंतेची बाब आहे असं त्यांनी पुढे माहिती दिली.