फिफा विश्वचषक २०२२ मध्ये, ब्राझीलने त्यांच्या पहिल्या सामन्यात सर्बियाचा २-० ने पराभव केला. मात्र या सामन्यात ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार जखमी झाला होता. आता त्याच्या दुखापतीचे मोठे अपडेट समोर येत आहे. वास्तविक, ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू त्याच्या दुखापतीतून झपाट्याने सावरत आहे. दुखापतीबाबत त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक मोठी अपडेट शेअर केली आहे.
ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या दुखापतीबाबत अपडेट देताना एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ”ब्राझीलचा शर्ट घालून मला जो अभिमान आणि प्रेम वाटते ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. जर देवाने मला जन्माला येण्यासाठी एखादा देश निवडण्याची संधी दिली तर तो ब्राझील असेल. माझ्या आयुष्यात काहीही सोपे नव्हते, मला नेहमी माझ्या स्वप्नांचा आणि ध्येयांचा पाठलाग करावा लागला.”
नेमार पुढे म्हणाला, ”आजचा दिवस माझ्यासाठी खूप कठीण गेला, वर्ल्ड कपमध्ये मला पुन्हा दुखापत झाली आहे. हो त्रासदायक आहे. पण मला खात्री आहे की मला पुनरागमन करण्याची संधी मिळेल. कारण मी माझ्या देशाला, माझ्या संघसहकाऱ्यांना आणि स्वतःला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मी अशक्य देवाचा पुत्र आहे आणि माझा विश्वास असीम आहे.”
त्याचवेळी नेमारच्या दुखापतीवर ब्राझील संघाच्या डॉक्टरांनी नेमार पुढील सामन्यात संघाचा भाग नसल्याचं सांगितलं होतं. त्यांची काळजी घेतली जात आहे. या दुखापतीतून तो लवकरच सावरेल. फिफा विश्वचषक २०२२ मध्ये ब्राझीलची सुरुवात चांगली झाली होती. त्यांनी पहिल्या सामन्यात सर्बियाचा २-० असा पराभव केला. ब्राझीलचा पुढील सामना २८ नोव्हेंबरला स्वित्झर्लंडशी होणार आहे. या सामन्यात नेमार संघाचा भाग असणार नाही. ब्राझीलचा तिसरा सामना कॅमेरूनशी होणार आहे. हा सामना ३ डिसेंबरला खेळवला जाणार आहे.