स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे जगज्जेते होण्याचे स्वप्न भंगले आहे. कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत पोर्तुगालला आपल्या स्टार खेळाडूकडून खूप आशा होत्या. मोरोक्कोने रोनाल्डो आणि पोर्तुगालचे जगज्जेते होण्याचे स्वप्न भंगवले. पोर्तुगालच्या उपांत्यपूर्व फेरीतील पराभवानंतर प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की, ख्रिस्तियानो रोनाल्डो यापुढे विश्वचषक ट्रॉफी उचलू शकणार नाही का? कारण स्पर्धा सुरू होण्यापूर्वी हा रोनाल्डोचा शेवटचा विश्वचषक म्हणून ओळखला जात होता.
३७ वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो आपला पाचवा विश्वचषक खेळत होता. मोरोक्कोने उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालचा १-० असा धुव्वा उडवत प्रथमच फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मोरोक्कोने फिफा विश्वचषकाच्या अंतिम चारमध्ये पोहोचणारा पहिला आफ्रिकन आणि अरब देश बनण्याचा मान मिळवला. अल थुमामा स्टेडियमवर जागतिक क्रमवारीत २२व्या स्थानावर असलेल्या मोरोक्कोसाठी युसेफ एन नेसरीने ४२व्या मिनिटाला सामन्यातील निर्णायक गोल केला.
रोनाल्डोला आवरता आले नाहीत अश्रू –
पोर्तुगाल वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. मैदानाबाहेर जाताना रोनाल्डोच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आता विश्वचषक जिंकण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही हे कदाचित रोनाल्डोला चांगलेच ठाऊक असेल. त्याच्या कारकिर्दीतील हा शेवटचा विश्वचषक ठरू शकतो. रोनाल्डोचा हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रोनाल्डोची वर्ल्डकपमधील सुरुवात वादानेच झाली होती –
मोरोक्कोविरुद्धच्या सामन्यातही रोनाल्डोला सुरुवातीच्या इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. त्याच्या जागी युवा फुटबॉलपटू गोन्सालो रोमोसला सुरुवातीच्या इलेव्हनमध्ये संधी मिळाली होती. रोमोस तोच खेळाडू आहे, ज्याने स्वित्झर्लंडविरुद्ध प्री क्वार्टर फायनलमध्ये ३ गोल केले होते. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत त्याला प्रभाव पाडणारी कामगिरी करता आली नाही. कतार फिफा विश्वचषक रोनाल्डोसाठी पटकन विसरण्यासारखा होता. विश्वचषकात रोनाल्डोचा प्रवेश क्लबसोबतच्या वादाने सुरु झाला होता.