brazil vs croatia Neymar crying video: फिफा फुटबॉल विश्वचषकातील धक्कादायक निकालांची मालिका उपांत्यपूर्व फेरीतही कायम राहिल्याचं शुक्रवारी ब्राझील विरुद्ध क्रोएशिया सामन्यामध्ये पहायला मिळाली. या संघांमध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यात क्रोएशियाने बलाढ्य ब्राझीलला पराभूत करत उपांत्य फेरीत धडक मारली. पेनेल्टी शूट आऊटमध्ये क्रोएशियाने हा सामना ४-२ ने जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या पराभवामुळे ब्राझील या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या पराभवाचा एवढा मोठा धक्का ब्राझीलच्या चाहत्यांबरोबरच ब्राझिलीयन खेळाडूंनाही बसला आहे.
सुप्रसिद्ध फुटबॉलपटू नेयमारने तर या पराभवानंतर आपण ब्राझीलच्या जर्सीमध्ये पुन्हा कधी मैदानावर उतरु की नाही याबद्दल शंका असल्याचं विधान केलं आहे. नेयमारचं हे विधान त्याच्या चाहत्यांसाठी धक्का देणारं आहे. पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या ब्राझीलचा संघ २०२२ च्या स्पर्धेतून बाहेर पडल्याने नेयमार फारच हताश झाला आहे. विशेष म्हणजे नेयमारनेच या सामन्यामध्ये ब्राझीकडून पहिला गोल नोंदवत पेले यांच्या ७७ गोल्सच्या विक्रमाची बरोबरी केली होती. मात्र १-० ची आघाडी मिळवल्यानंतर सामन्यातील ११७ व्या मिनिटाला क्रोएशियाने बरोबर करत पेनल्टी शूट आऊटमध्ये सामना जिंकला.
पराभूत झाल्यानंतर नेयमार मैदानावरच गुडघ्यांमध्ये डोक घालून हताश बसल्याचं पहायला मिळालं. तो मैदानातच रडू लागला. नेयमारचा सहकारी थिआगो सिल्वाने त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या १५ मिनिटांमध्ये हा सामना २०१८ च्या उपविजेत्या क्रोएशियाच्या बाजूने फिरल्याने मैदानात उपस्थित असलेल्या हजारो ब्राझिलीयन चाहत्यांना जे काही घडलं त्यावर विश्वास बसत नव्हता. हा धक्का चाहत्यांइतकाच खेळाडूंनाही बसल्याचं सामना संपल्यानंतर मैदानामध्ये पहायला मिळालं.
नियोजित ९० मिनिटांच्या खेळात सामना गोलशून्यच्या बरोबरीत असल्याने अतिरिक्त वेळ वाढवून देण्यात आला. सामन्यातील १०६ व्या मिनिटाला नेयमारने गोल करत पेले यांच्या ७७ गोल्सच्या राष्ट्रीय विक्रमाशी बरोबर केली. मात्र ब्राझील आणि नेयमारचा हा आनंद अल्प काळ टीकला. कारण एक्स्ट्रा टाइमच्या सेकेण्ड हाफमध्ये ब्रूनो पेटकोव्हिचने सामन्यात ११७ व्या मिनिटाला बरोबरी करत सामना पेनल्टी शूट आऊटमध्ये नेला.
नेयमारने रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक आणि कोपा अमेरिका यासारख्या मोठ्या स्पर्धा २०१९ मध्ये जिंकल्या आहेत. मात्र नेयमार असलेल्या ब्राझिलीयन संघाला विश्वचषक जिंकता आलेला नाही. संघाला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत आणण्यात नेयमराचा मोलाचा वाटा होता. मात्र त्याला संघाला पुढील फेरीत घेऊन जाता आलं नाही. आपल्या पुढील वाटचालीसंदर्भात नेयमारने शंका व्यक्त केली आहे.
“खरं तर मला ठाऊक नाही. सध्या याबद्दल बोलणं योग्य ठरणार नाही असं मला वाटतं कारण आता मी भावनेच्या भरात बोलत असेल. कदाचित मी सरळ विचार करत नसेल,” असंही नेयमारने म्हटलं. नेयमार आता ३० वर्षांचा असून २०२६ च्या विश्वचषक स्पर्धेच्या वेळेस तो ३४ वर्षांचा असेल. त्यामुळेच ही नेयमारची शेवटची विश्वचषक स्पर्धा होती अशी चाहत्यांमध्ये कुजबूज आहे. मात्र स्वत: नेयमारने याबद्दलची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
“हा शेवट आहे असं म्हणणं घाईचं ठरेल. मात्र मी कशाचीही शाश्वती देऊ शकत नाही. पाहूयात पुढे काय होतंय. मला आता हा वेळ विचार करण्यासाठी हवा आहे. आपण पुढे नेमकं काय करावं याचा मी विचार करणार आहे. मी सध्या तरी ब्राझीलच्या संघामध्ये खेळण्याचे दरवाजे माझ्याबाजूने बंद केलेली नाही. मात्र त्याचवेळी मी पुन्हा येईन की नाही हे १०० टक्के खात्रीने सांगू शकत नाही,” असं नेयमार म्हणाला.
दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये अर्जेंटिनाने नेदरलँड्सला पराभूत करुन उपांत्य फेरीत धडक मारली असून आता क्रोएशिया आणि अर्जेंटिनादरम्यान उपांत्य फेरीचा सामना होणार आहे.