कतारमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या फिफा विश्वचषक २०२२ मध्ये लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघाला पहिल्या अपसेटला सामोरे जावे लागले. त्यांना सौदी अरेबियाकडून २-१ ने पराभूत व्हावे लागले. हा गट-सी सामना २२ नोव्हेंबर रोजी लुसेल स्टेडियमवर खेळला गेला. आता अर्जेंटिनाला आपला दुसरा सामना २७ नोव्हेंबरला मेक्सिकोविरुद्ध खेळायचा आहे. या अगोदर दोन्ही संघाच्या चाहत्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मात्र या सामन्या अगोदरच मेक्सिकोचे समर्थक खुपच उत्साही असल्याचे दिसून येत आहेत. याच कारणामुळे त्यांनी मेस्सीला शिवीगाळ केली आहे. हे ऐकल्यानंतर मेस्सीचे चाहते त्या सगळ्यांशी भिडले. ही घटना २३ नोव्हेंबर रोजी घडली. याच्या एक दिवस आधी अर्जेंटिनाला सौदी अरेबियाकडून पराभव पत्कारावा लागला होता.
सुपर-१६ मध्ये पोहोचण्यासाठी आता मेस्सीच्या टीम अर्जेंटिनाला त्यांचे दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. म्हणजे अर्जेंटिनाचे उर्वरित दोन सामने करो या मरो स्परुपाचे असणार आहेत. यातील एक सामना २७ नोव्हेंबरला मेक्सिको सोबत तर दुसरा सामना १ डिसेंबरला पोलंड सोबत खेळला जाणार आहे. मात्र या दोन्ही सामन्यांपूर्वी हा मोठा गदारोळ झाला आहे.
काही लोक मेस्सीला शिवीगाळ करताना व्हिडिओ बनवत होते –
सौदी अरेबियाविरुद्धच्या पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी दोहा येथील अल विद्दा पार्कमध्ये अर्जेंटिना आणि मेक्सिको संघाच्या चाहत्यांमध्ये राडा झाला. ही घटना अल विड्डा पार्कच्या फॅन्स झोनमधील आहे. येथे मेक्सिको संघाचे चाहते एक व्हिडिओ बनवत होते, ज्यामध्ये ते मेस्सीला शिवीगाळ करत होते. हे ऐकल्यानंतर मेस्सीचे चाहते संतापले आणि प्रचंड गदारोळ झाला.
हेही वाचा – FIFA World Cup 2022: इराणची वेल्सवर सरशी; भरपाई वेळेत चेश्मी, रमिनचे निर्णायक गोल
अर्जेंटिना आणि मेक्सिको संघाच्या चाहत्यांच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे घटनेच्या वेळी आजूबाजूला एकही सुरक्षा रक्षक किंवा पोलीस नव्हता. अशा परिस्थितीत कतारच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता अर्जेंटिना आणि मेक्सिको यांच्यातील सामना अत्यंत कडेकोट बंदोबस्तात होणार आहे.