एल रायन : गतविजेत्या फ्रान्सला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात बुधवारी टय़ुनिशियाकडून ०-१ असा पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतरही फ्रान्सने ड-गटात अग्रस्थानासह बाद फेरी गाठली. मात्र, या सामन्याच्या भरपाई वेळेतील अखेरच्या मिनिटाला अ‍ॅन्टोन ग्रीझमनने केलेला गोल अपात्र ठरवण्यात आला होता. याबाबत फ्रान्स फुटबॉल महासंघाने ‘फिफा’कडे तक्रार केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यात ५८ व्या मिनिटाला वहाबी काझरीने गोल करत टय़ुनिशियाला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर फ्रान्सने पुनरागमनाचे प्रयत्न सुरू केले. ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेतील आठव्या आणि अखेरच्या मिनिटाला ग्रीझमनने मैदानी फटका मारून गोल करत फ्रान्सला बरोबरी करून दिली होती. मात्र, ‘व्हीएआर’ची मदत घेत मुख्य पंच मॅथ्यू कोन्गर यांनी हा गोल अपात्र ठरवला. गोल करण्यापूर्वी ग्रीझमन ऑफसाईड होता, असे कोन्गर यांचे मत होते. मात्र, हा गोल नक्की का रद्द करण्यात आला, याबाबत सामन्यानंतर पंचांनी पूर्ण माहिती दिली नाही, असे फ्रान्स फुटबॉल महासंघाचे म्हणणे आहे. तसेच हा गोल अपात्र ठरवणे योग्य नव्हते, असेही महासंघाचे मत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2022 france file complaint to fifa over disallowed griezmann goal against tunisia zws