अल थमुमा : तारांकित आघाडीपटू ख्रिस्टियन पुलिसिकने पूर्वार्धात ३८व्या मिनिटाला केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर अमेरिकेने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आपल्या भौगोलिक राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या इराणचा १-० असा पराभव केला. या विजयासह अमेरिकेने ब-गटातून दुसरे स्थान मिळवत बाद फेरीत प्रवेश केला. अमेरिकेचा संघ १९९४ पासून पाचव्यांदा बाद फेरीत पोहोचला आहे.
अल थमुमा स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांमध्ये इराणच्या पाठिराख्यांची संख्या अधिक होती. त्यांच्याकडून मिळत असलेल्या पाठिंब्याच्या जोरावर इराणचा खेळ उंचावेल अशी अपेक्षा होती. मात्र, ३८व्या मिनिटाला सर्जिओ डेस्टच्या पासवर पुलिसिकने गोल नोंदविल्यावर मैदान शांत झाले होते. पुलिसिकची देहबोली फारशी सहज नव्हती. त्याला पायाच्या वेदनेने त्रस्त केले होते. त्याला मैदानावर उपचारदेखील घ्यावे लागले. अशा परिस्थितीतही पुलिसिकने गोल केला. मात्र, अखेरीस पोटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावेच लागले. पुलिसिकला नंतर रुग्णालयातही नेण्यात आले.
अमेरिकेचा नेदरलँड्स, इंग्लंडचा सेनेगलशी सामना
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ब-गटातील लढतींनंतर उपउपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या दोन सामन्यांचे चित्र स्पष्ट झाले. उपउपांत्यपूर्व फेरीत आता अमेरिकेपुढे नेदरलँड्सचे, तर इंग्लंडपुढे सेनेगलचे आव्हान असेल.