कतार येथे खेळल्या जात असलेल्या फिफा विश्वचषक २०२२ च्या बाद फेरीत पोहोचण्यासाठी सर्व संघ आपापल्या गटात संघर्ष करताना दिसत आहेत, जिथे शनिवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात फ्रेंच संघाने डेन्मार्कचा पराभव करून बाद फेरीत प्रवेश केला आहे. फिफा विश्वचषक २०२२ च्या बाद फेरीत पोहोचणारा हा पहिला संघ ठरला आहे. फ्रेंच संघाच्या या विजयात त्यांचा अनुभवी फुटबॉलपटू किलियन एमबाप्पेचा मोठा हात होता, ज्याने २ गोल करत आपल्या संघाला डेन्मार्कवर २-१ असा विजय मिळवून दिला. कतारच्या विश्वचषकात किलियन एमबाप्पेचा गोल करण्याचा वेग थांबण्याची चिन्हे दिसत नाही.
१८ डिसेंबरच्या अंतिम सामन्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच २० डिसेंबरला किलियन एमबाप्पे आपला २४ वा वाढदिवस साजरा करणार आहे. जरी एमबाप्पे पूर्वार्धात थोडासा स्वार्थी वाटत होता तरी ब्रेकनंतर उत्तरार्धात एमबाप्पेने ९७४ स्टेडियमवर दोन गोल करून सामना स्वत:च्या हातात घेतला. थिओ हर्नांडेझच्या कट-बॅकमधून त्याने डिफेंडरसह वन-टू नंतर उसळत्या पहिल्याच फिनिशसह स्कोअरिंग उघडले तेव्हा इतर कोणत्याही गोष्टी महत्त्वाच्या नव्हत्या आणि जेव्हा त्याने अँटोनी ग्रीझमनच्या क्रॉसवर त्याने गोल केला तेव्हा तो सामना जिंकल्यातच जमा झाला होता.
एमबाप्पेने आता फ्रान्ससाठी ६१ सामन्यांमध्ये ३१ गोल केले आहेत जे आता ऑलिव्हियर गिरौड आणि थियरी हेन्री यांच्या ५१ गोलच्या सर्वकालीन विक्रमाजवळ जात आहे. फ्रान्सच्या स्कोअररच्या यादीत तो महान खेळाडू झिनेदिन झिदानच्या बरोबरीने सातव्या क्रमांकावर आहे. एमबाप्पेचे विश्वचषक स्पर्धेत सात गोल आहेत. जस्ट फॉन्टेन यांनी १९५८ मध्ये विक्रमी १३ गोल केले होते जो आत्ता पर्यंतचा सर्वोत्तम विक्रम आहे. एमबाप्पे हेन्रीच्या पुढे आहे कारण त्याने विश्वचषकात केवळ सहा गोल केले होते.
प्रशिक्षक डिडिएर डेशॅम्प्स यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “किलियन हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. मी हे आधीच अनेकदा सांगितले आहे, त्याच्यात निर्णायक घेण्याची, वस्तुस्थितीत फरक करण्याची क्षमता आहे, किलियन चांगली कामगिरी करण्यासाठी सर्व काही करतो आणि पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने हेच सिद्ध केले आहे. हे आमच्या संघासाठी चांगले ठरत आहे.” दुखापतग्रस्त करीम बेन्झेमाच्या अनुपस्थितीत ऑलिव्हियर गिरौड एकटा स्ट्रायकर म्हणून खेळत असताना, एमबाप्पेने डाव्या बाजूला असलेले स्थान घेतले आणि त्याने त्याच्या पुर्वानुभवाचा म्हणजेच २०१८ मध्ये लागोपाठ तीन विश्वचषक सामन्यांमध्ये गोल करण्याचा सर्वाधिक फायदा घेतला.
डेशॅम्प्स पुढे म्हणतात, “धोका निर्माण करणारे इतर खेळाडू त्याच्या आजूबाजूला असल्याच्या वस्तुस्थितीमुळे तो थोडा अधिक मोकळा होऊन खेळू शकतो. तो एका मजबूत सामूहिक संघाचा भाग आहे आणि त्याच्या मनात विश्वचषक जिंकण्याचे ध्येय आहे.”