लुसेल : उत्तरार्धात पाच मिनिटांत दोन गोल केल्यानंतरही भरपाई वेळेत गोल स्वीकारावा लागल्यामुळे मेक्सिकोचे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. क-गटातील अखेरच्या साखळी सामन्यात मेक्सिकोने सौदी अरेबियावर २-१ असा विजय मिळवला.
हेन्री मार्टिनने ४७व्या, तर लुईस शाव्हेझने ५२व्या मिनिटाला मेक्सिकोसाठी गोल केले. या दोन गोलमुळे मेक्सिकोला बाद फेरी प्रवेशाची संधी निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर सौदी अरेबियाचा गोलरक्षक मोहम्मद अल ओवेसचा अप्रतिम खेळ, अपात्र ठरविण्यात आलेले दोन गोल आणि ९५व्या मिनिटाला सौदी अरेबियाच्या डावसरीने नोंदवलेल्या गोलमुळे मेक्सिकोला निराश व्हावे लागले.
या स्पर्धेतील पहिल्या दोनही साखळी सामन्यांत मेक्सिकोला गोल नोंदविण्यात अपयश आले होते. अखेरचा सामना जसा पुढे जाऊ लागला, तशा मेक्सिकोच्या बाद फेरीच्या आशा उंचावल्या होत्या. सुरुवातीपासून मेक्सिकोने सामन्यावर वर्चस्व राखले होते.
उत्तरार्धात दुसऱ्या मिनिटाला मेक्सिकोने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. सीझर मॉन्टेसच्या पासवर मार्टिनने मेक्सिकोचे खाते उघडले. त्यानंतर पाचच मिनिटांनी शाव्हेझने २० मीटरवरून फ्री-किकवर अफलातून गोल करत मेक्सिकोची आघाडी वाढवली. त्यानंतर लोझानो आणि अन्तुनाचे गोल पंचांनी अपात्र ठरवले. सौदीचा गोलरक्षक ओवेस मेक्सिकोची आक्रमणे परतवून लावत होता. भरपाई वेळेत मेक्सिकोचे खेळाडू थकलेले वाटले. याचा त्यांना फटका बसला.