१८ डिसेंबर रोजी फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेसीचे विश्वचषक विजयाचे स्वप्न साकार झाले. अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ ने पराभव करत ३६ वर्षानंतर जेतेपदावर नाव कोरलं. किलियन एम्बापेने हॅट-ट्रीक साधत फ्रान्सला विजय मिळवून देण्याचा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला मात्र सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटनेच लागला. अर्जेंटिनाने विश्वचषक जिंकल्यानंतर चषक स्वीकारण्यासाठी मेसी जेव्हा मंचावर चढला तेव्हा त्याने त्याच्या आयकॉनिक जर्सीवर काळ्या रंगाचं एक कापड घातलेलं दिसलं आणि हे कापड नंतर फारच चर्चेत आलं. मात्र आता त्याचसाठी एक खुली ऑफर मेसीला देण्यात आली आहे.
मेसीला कोणी घातलं हे कापड?
मेसीने फिफाचे अध्यक्ष जेनीन एन्फॅण्टीनो आणि कतारचे राजा तमिम बील अहमद अल थानी यांच्या हस्ते विश्वचषक स्वीकारला. मात्र त्याआधी कतारच्या राजाने मेसीचा एक पारंपारिक कापड देऊन सन्मान केला. मेसीने एखाद्या पारदर्शक कोट प्रमाणे दिसणारा हा कपडा स्वीकारला आणि तसाच चषक स्वीकारुन तो मंचावरील आपल्या संघातील सहकाऱ्यांकडे गेला. मेसीला देण्यात आलेल्या कापडला बिश्त असं म्हणतात.
हे कापड नेमकं आहे तरी काय?
बिश्त हा अरब देशांमधील पुरुषांच्या पारंपरिक पोषाखाचा भाग आहे. मागील हजारो वर्षांपासून अरब देशांमध्ये हा कापडा मानाचं प्रतिक म्हणून वापरला जातो. आपल्याकडे जसा मान-सन्मान करण्यासाठी फेटा किंवा पगडी घालण्याची प्रथा आहे तशीच प्रथा या बिश्तसंदर्भात अरेबियन देशांमध्ये आहे. खास कार्यक्रमांच्या दिवशी बिश्त परिधान केले जातात. यामध्ये लग्नसमारंभ, सणासुदी किंवा शुभ प्रसंगांचा समावेश होतो. या बिश्तचा अजून एक खास अर्थ आहे. सामान्यपणे हे बिश्त वरिष्ठ अधिकारी परिधान करतात. म्हणजेच हा कापड राजेशाही थाट, श्रीमंती, विशेष सोहळे यांच्याशी संलग्न मानपानाचा एक बाग आहे. पाश्चिमात्य जगामध्ये काळ्या रंगाची टाय घालून महत्त्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली जाते तशाचप्रकारे बिश्त परिधान करुन अरब देशांमधील खास कार्यक्रमांना हजेरी लावतात.
नक्की वाचा >> अर्जेंटिना FIFA World Cup जिंकला अन् तिने मैदानात कॅमेरासमोरच टॉप काढला; Video Viral झाल्यानंतर…
कोणी दिलीय हा बिश्त विकत घेण्याची ऑफर?
हे कापड मेसीच्या अंगावर घालण्यावरुन जगभरामध्ये दुमत आहे. अनेकांनी या कापडामुळे मेसीची जर्सी झाकल्याचा मुद्दा उपस्थित करत आक्षेप नोंदवला. तर अरब देशांमधील चाहत्यांनी मात्र यामुळे समाधान वाटल्याचं म्हटलं. या बिश्तवरुन वाद सुरु असतानाच केवळ मेसीने परिधान केला म्हणून सामान्य भाषेत काळ कापड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वस्तूला अधिक मूल्या प्राप्त झालं आहे. ओमानमधील वकिलांची संस्था असलेल्या ओमानी शुरा काऊन्सिलचे माजी अध्यक्ष असलेल्या अहमद अल बरवानी यांनी काय बिश्तसाठी मोठी रक्कम मोजण्याची तयारी दर्श्वली आहे. बरवानी यांनी या बिश्तसाठी १ मिलियन अमेरिकी डॉलर्सची ऑफर दिली आहे. भारतीय चलनानुसार सध्या ही किंमत ८ कोटी २६ लाख रुपये इतकी होती.
काय म्हटल् आहे बरवानी यांनी?
“मेसी माझ्या मित्रा, मी तुला विश्वचषक जिंकल्याबद्दल शुभेच्छा देतो. कतारच्या राजांनी तुझ्या अंगावर बिश्त घातल्याने मला अभिमान वाटला. हे बिश्त म्हणजे मोठा पराक्रम केल्याचं, दृरदृष्टी असल्याचं निशाण असून ते तुझ्या खांद्यावर शोधून दिसत होतं,” असं बरवानी यांनी ट्वीट केलं आहे. तसेच याच ट्वीटमध्ये त्यांनी, “तू मला ते बिश्त ते मी त्या मोबदल्यात एक मिलियन डॉलर्स देईल,” असंही बरवानी यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> विश्लेषण : अर्जेंटिना वि. फ्रान्स विश्वचषक फुटबॉल इतिहासातील सर्वांत रोमांचक अंतिम सामना ठरतो का?
वादात राहिलाय हा बिश्त
मेसीची आयकॉनिक १० क्रमांकाची जर्सी आणि हातात विश्वचषक असा ऐतिहासिक फोटो या बिश्तमुळे काढता आला नाही अशी टीका अनेक चाहत्यांनी केली आहे. तसेच समलैंगिकांसाठी असलेले आर्मबॅण्डला कतारने विरोध केला मग अशाप्रकारे बिश्त मेसीला का देण्यात आलं याबद्दलही अनेकांनी सोशल मीडियावरुन आक्षेप घेतला. फिफाच्या नियमांनुसार धार्मिक भावना, प्रांतवाद, राजकीय भाष्य यासारख्या गोष्टींशी संबंधित झेंडे, फलक दाखवणे प्रतिबंधित करण्यात आले आहे.