सेनेगलचा दिग्गज खेळाडू सादिओ माने पायाच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया केल्याने विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बायर्न म्युनिक आणि सेनेगल फुटबॉल फेडरेशनने ही माहिती दिली. बायर्नने जारी केलेल्या निवेदनानुसार, ३० वर्षीय माने याच्या उजव्या पायावर शुक्रवारी रात्री उशिरा ऑस्ट्रियातील इन्सब्रक येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. ८ नोव्हेंबर रोजी जर्मन लीगमधील वेर्डर ब्रेमेन विरुद्धच्या सामन्यात त्याला ही दुखापत झाली.
बायर्न म्हणाले, “हा एफसी बायर्नचा आघाडीचा खेळाडू यापुढे विश्वचषकात सेनेगलचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपलब्ध असणार नाही. येत्या काही दिवसांत म्युनिकमध्ये त्याचे रिहॅबिलिटेशन (उपचारातून पुनर्प्राप्ती) सुरू करेल.” डॉक्टर मॅन्युएल अफॉन्सो यांनी यापूर्वी आशा व्यक्त केली होती की, माने विश्वचषकातील काही सामने खेळू शकेल, पण आता ते शक्य नाही.
ते पुढे म्हणाले, “आम्ही एमआरआय पाहिला आहे आणि दुर्दैवाने त्याची प्रगती अपेक्षेप्रमाणे झालेली नाही.” सेनेगलचा संघ सोमवारी नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्याने विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर अ गटातील संघासमोर यजमान कतार आणि इक्वेडोरचे आव्हान असेल.
सादिओ माने २०१२ पासून सेनेगल फुटबॉल संघाकडून खेळत आहे. त्याने ९६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३६ गोल केले आहेत. या मोसमात, तो बायर्न म्युनिचशी संबंधित आहे. या क्लबकडून त्याने १४ सामन्यांत ६ गोल केले आहेत. लिव्हरपूल क्लबच्या वतीने खेळून त्याला प्रसिद्धी मिळाली. इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये त्याने २०१६ ते २०२२ दरम्यान लिव्हरपूलसाठी १९६ सामन्यांमध्ये ९० गोल केले आहेत. त्याची आणि मोहम्मद सलाहची जोडी सुपरहिट ठरली होती.