कतारमध्ये सुरू असलेली फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. मोरोक्कोने उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालचा पराभव करून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. उपांत्य फेरीत पोहोचणारा मोरोक्को हा पहिला अरब-आफ्रिकन संघ ठरला आहे. हा प्रसंग ऐतिहासिक आहे आणि त्याचा उत्सवही संस्मरणीय पद्धतीने साजरा केला जात आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यानंतर मोरोक्कोच्या विविध शहरांमध्ये जल्लोष सुरु झाला आणि लोक रस्त्यावर उतरले.
मोरोक्कोच्या कॅसाब्लांका शहरात हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून आपल्या देशाच्या विजयाचा आनंद साजरा केला. इथे लोक रस्त्यावर नाचले, खूप धमाल केली. असे दृश्य देशात प्रथमच पाहिल्याचा दावा स्थानिक माध्यमांनी केला आहे. जे चाहते कतारला जाऊ शकले नाहीत, ते स्थानिक लोकांसह मोरोक्कोमधील उत्सवात सामील झाले.
हा विजय केवळ मोरोक्कोमध्येच नाही तर कतार, सौदी अरेबियासह इतर अरब देशांमध्येही साजरा करण्यात आला. मोरोक्कोने स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाचा १-० असा पराभव करून त्यांना विश्वचषकातून बाहेर काढले. मोरोक्कोसाठी युसेफ एन नेसरीने ४२ व्या मिनिटाला गोल केला, जो निर्णायक ठरला.
शकीरा, इम्रान खान यांचा ट्विट व्हायरल –
उपांत्य फेरीत पोहोचणारा मोरोक्को हा पहिला आफ्रिकन देश आहे, त्यामुळे तिथे जल्लोष सुरू आहे. प्रसिद्ध गायिका शकीरानेही मोरोक्कोच्या विजयाचा आनंद साजरा केला आणि ट्विट केले की, ‘यावेळी आफ्रिकेसाठी’ शकीराचे हे ट्विट व्हायरल झाले. शकीराने फिफा वर्ल्ड कपचे थीम सॉंग गायले होते, ज्यामध्ये हे बोल होते.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही मोरोक्कोच्या विजयावर ट्विट केले आहे. इम्रान खानने ट्विटमध्ये लिहिले की, ”फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोर्तुगालला हरवल्याबद्दल मोरोक्कोचे अभिनंदन. पहिल्यांदाच अरब, आफ्रिकन आणि मुस्लिम देशाचा संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्याबद्दल आणि आगामी सामन्यांसाठी त्यांना शुभेच्छा.”
फिफा विश्वचषक उपांत्य फेरीचे वेळापत्रक –
१३ डिसेंबर – क्रोएशिया विरुद्ध अर्जेंटिना (उशीरा रात्री साडेबारा)
१४ डिसेंबर – मोरोक्को विरुद्ध फ्रान्स (उशीरा साडेबारा)