दोहा : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील ह-गटात शुक्रवारी झालेल्या सामन्यात आशियाई देश दक्षिण कोरियाने पोर्तुगालचा २-१ असा पराभव केला. या गटातील अन्य सामन्यात उरुग्वेने घानाला २-० असे पराभूत केले. मात्र, तीन साखळी सामन्यांत मिळून उरुग्वेपेक्षा अधिक गोल केल्याने कोरियाने बाद फेरीत प्रवेश केला. पोर्तुगालने गटात अव्वल स्थान मिळवले.
यापूर्वीच बाद फेरीत प्रवेश केलेल्या पोर्तुगालने सामन्याच्या पाचव्या मिनिटाला गोल करुन वेगवान सुरुवात केली. हा गोल रिकाडरे होर्टाने केला. त्यानंतर पोर्तुगालने चेंडूवर नियंत्रण राखले, पण त्यांना गोलच्या संधी निर्माण करता आल्या नाहीत. कोरियाच्या सॉन ह्युंग मिनच्या वेगाचा सामना करण्यातही पोर्तुगालचा संघ अपयशी ठरला. २७व्या मिनिटाला योंग ग्वान किमने कोरियाला बरोबरी साधून दिली. मग ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेतील वांग ही-चॅनने केलेल्या प्रेक्षणीय गोलने कोरियाचा विजय आणि बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला. पोर्तुगालचा कॉर्नर फसल्यानंतर सोंगने चेंडूचा ताबा मिळवून पोर्तुगालच्या कक्षात मुसंडी मारली. त्याच वेळी सोंगच्या मागोमाग तेवढय़ाच वेगाने चॅनने मैदानाचे अंतर पार करत पोर्तुगालच्या गोलकक्षात प्रवेश केला आणि सोंगच्या पासला अचूक जाळीची दिशा देत कोरियाचा विजयी गोल केला.
गटातील दुसऱ्या सामन्यात उरुग्वेने घानाचा २-० असा पराभव केला. पूर्वार्धातील अरास्काएटाने २६ आणि ३२व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे मिळविलेल्या आघाडीत उरुग्वेला भर घालता आली नाही. त्यामुळे विजयानंतरही त्यांचे आव्हान संपुष्टात आले.
गोल निर्णायक
तीन साखळी सामन्यांअंती कोरिया आणि उरुग्वे या दोन्ही संघाचे गुण (४) आणि गोलफरकही (०) समान होता. मात्र, कोरियाने तीन सामन्यांत ४ गोल केले, तर उरुग्वेला केवळ २ गोल करता आले. हाच या दोन संघाच्या विश्वचषक प्रवासातील निर्णायक फरक ठरला.