FIFA World Cup 2022, Riots in Brussels: कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषकाच्या सामन्यात रविवारी मोरोक्कोने बेल्जियमवर विजय मिळवल्यानंतर हिंसाचार उसळला. यानंतर बेल्जियम पोलिसांनी डझनभर लोकांना ताब्यात घेतले आणि एकाला अटक केली. त्याचवेळी ब्रसेल्समध्ये आंदोलकांनी एक कार आणि काही इलेक्ट्रिक स्कूटर पेटवल्या. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये अनेक ठिकाणी दंगली झाल्या. हिंसाचारात सहभागी असलेल्या अनेक फुटबॉल चाहत्यांनी मोरोक्कोचे झेंडे हातात घेतले होते. त्याचवेळी लोकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या तोफगोळ्या आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
बेल्जियमच्या दणदणीत पराभवानंतर चाहत्यांनी तोडफोड आणि हुल्लडबाजी केली. या गोंधळानंतर पोलिसांना अनेक भागात कडेकोट नाकाबंदी लावावी लागली आणि हिंसक झालेल्या लोकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा आणि पाण्याच्या तोफांचा वापर करावा लागला. मोरोक्कोविरुद्धच्या अनपेक्षित पराभवामुळे संतप्त झालेल्या लोकांनी आग लावली आणि गाड्यांवर दगडफेक केली. पोलिसांनी किती जणांना ताब्यात घेतले आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. खरं तर, मोरोक्कन वंशाच्या काही समर्थकांनी त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली, त्यानंतर हिंसाचार उसळला.
मेट्रो आणि अत्यावश्यक परिवहन सेवा बंद
ब्रसेल्सचे महापौर फिलिप क्लोस यांनी लोकांना शहराच्या केंद्रापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. रस्त्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांना खबरदारीचा उपाय म्हणून तेथील मेट्रो आणि ट्रॉम सेवा बंद करावी लागली. हिंसाचाराचा प्रसार रोखण्यासाठी मेट्रो स्थानकांचे दरवाजे बंद करण्यात आले असून रस्त्यावर पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, दंगलखोरांनी पायरोटेक्निक साहित्य, प्रोजेक्टाइल, काठ्या वापरल्या आणि सार्वजनिक महामार्गावर आग लावली. या फटाक्यांमुळे एका पत्रकाराच्या चेहऱ्याला दुखापत झाली. हा गोंधळ थांबवण्यासाठी आणि दंगलखोरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्यांचा आणि अश्रुधुराचा वापर केला. या भागातील उपद्रवी घटकांवर पोलिसांची सतत नजर असते. त्यामुळे शहरात पुन्हा अशांततेचे वातावरण निर्माण होण्याची भीती पोलिसांना आहे. यासोबतच ताब्यात घेतलेल्या लोकांचीही पोलीस चौकशी करत आहेत. या दंगलीमागचे नेमके कारण आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
मोरोक्कोने २४ वर्षांनंतर विश्वचषकात सामना जिंकला
मोरोक्कन संघाने बेल्जियमचा पराभव करून या विश्वचषकात तिसरा मोठा अपसेट केला. यापूर्वी सौदी अरेबियाने अर्जेंटिनाचा तर जपानने जर्मनीचा पराभव केला होता. मोरोक्कोने बेल्जियमचा २-० असा पराभव करून पहिला विश्वचषक सामना जिंकला. विश्वचषकाच्या इतिहासात मोरोक्कोचा हा तिसरा विजय ठरला. त्यांचा शेवटचा विजय १९९८ मध्ये होता. त्यानंतर मोरोक्कोने स्कॉटलंडचा ३-० असा पराभव केला. १९८६ मध्ये त्यांना पहिला विजय मिळाला होता. मोरोक्कोने पोर्तुगालचा ३-१ असा पराभव केला. मोरक्कन संघ सहाव्यांदा विश्वचषक खेळत आहे.