ब्यूनोस आयर्स : विश्वचषकातील आतापर्यंतच्या सर्वात रोमांचक अंतिम सामन्यापैकी एक असलेल्या लढतीत विजय मिळवत जेतेपद पटकावणाऱ्या अर्जेटिना संघाचे मायदेशात आगमन झाले. आपल्या या जगज्जेत्या संघाला पाहण्यासाठी हजारो फुटबॉलप्रेमींनी गर्दी केली होती. कर्णधार लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखालील अर्जेटिना संघाचे जेव्हा राजधानीत आगमन झाले, तेव्हा चाहत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
विमानातून सर्वात पहिल्यांदा लिओनेल स्कालोनी विश्वचषकासोबत मेसीसह उतरले. यानंतर हे दोघेही एका फलकाजवळ गेले, जेथे ‘धन्यवाद, चॅम्पियन्स’ असे लिहिले होते. खेळाडूंचे स्वागत रॉक बँड ला मोस्काने ‘मुचाचोस’ हे गीत गाऊन केला. हे गाणे एक प्रशंसकाने बँडच्या एका जुन्या संगीतावर लिहिले होते. यानंतर विश्वविजयी संघाचे सदस्य खुल्या बसमध्ये दाखल झाले आणि मेसीसह अनेक खेळाडू ‘मुचाचोस’ हे गाणे गाताना दिसले. खेळाडूंना पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने चाहते रस्त्यांवर उतरले होते आणि अर्जेटिनाचा राष्ट्रध्वज फडकावत होते. त्यामुळे बस धिम्या गतीने जात होती. विमानतळ ते अर्जेटिना फुटबॉल संघटनेच्या (एएफए) मुख्यालयापर्यंतचे अंतर जवळपास ११ किलोमीटर आहे. या प्रवासाकरता बसला जवळपास एक तासाचा वेळ लागला.