प्रत्येक खेळामध्ये निर्णयाची अचूकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचे आगमन झाले आहे. मात्र आता हे तंत्रज्ञान चाहत्यांना खेळाचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने आनंद देण्यासाठी वापरण्यात येणार आहे. फुटबॉल विश्वचषकात कॅमेरा बसवलेला चेंडू वापरण्यात येणार आहे. या चेंडूला अंतर्गतच सहा एचडी दर्जाचे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे चेंडू ज्या ठिकाणी जाईल त्याप्रमाणे त्याचा प्रवास चाहत्यांना टिपता येणार आहे. ब्राझुका नावाचे हे चेंडू निळ्या, नारिंगी आणि हिरव्या रंगात असणार आहेत. फुटबॉलशी निगडित जल्लोषी आणि उत्साही वातावरणाचे प्रतीक म्हणून या रंगांची निवड करण्यात आली आहे.
‘‘फुटबॉलचे माहेरघर असलेल्या ब्राझीलमध्ये विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. याच्यापेक्षा आनंदाचा क्षण असू शकत नाही. विश्वचषक मोहिमेची सुरुवात आम्ही नव्या, आकर्षक उत्पादनांच्या अनावरणाने केली होती. विश्वचषकाची प्रतीकात्मक ओळख असलेल्या ब्राझुला चेंडूला तंत्रज्ञानाची जोड देत अनोखा चेंडू तयार करण्याचा आमचा प्रयत्न होता,’’ असे अदिदास इंडियाचे ब्रँड संचालक तुषार गोकुलदास यांनी सांगितले.
अदिदासतर्फे तयार करण्यात आलेला ब्राझुका हा १२वा चेंडू आहे. दक्षिण आफ्रिकेत २०१० मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या वेळी अदिदास कंपनीनेच तयार करण्यात आलेला जाबुलानी चेंडू वापरण्यात आला होता. मात्र हलक्या वजनामुळे हवेतील त्याच्या हालचालींमधल्या अनिश्चिततेमुळे या चेंडूवर प्रचंड टीका झाली होती.
दक्षिण आफ्रिका विश्वचषकाच्या वेळी झालेल्या त्रुटी लक्षात घेऊन या वेळेला चेंडू तयार करण्यात आला आहे. या चेंडूमध्ये अनोख्या समतल सहा पॅनेलचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यामुळे चेंडूवर ताबा मिळवणे, पकड, स्थिरता आणि हवेतील हालचालींमध्ये अचूकता असणार आहे. ब्राझुका चेंडूतील कॅमेऱ्याला ब्राझुकॅम असे नाव देण्यात आले असून, याद्वारे सर्वागीण मैदानाचे चित्र अनुभवता येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार म्हणजे या चेंडूतील कॅमेऱ्यांमध्ये चित्र काढण्याबरोबरच त्याच्यावर योग्य प्रक्रियाही केली जाणार आहे.
सहा पंख्यांच्या पॉल्युरेथेन पॅनेलच्या घट्ट समीकरणाने हा चेंडू बनला आहे. चेंडू हवेत स्थिर राहावा यासाठी खास प्रयत्न करण्यात आले आहेत. अडीच वर्षे सहाशेहून अधिक खेळाडू आणि दहा देशांच्या ३० विविध संघांद्वारे ब्राझुकाची चाचणी घेण्यात आली. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर चाचणी झालेला आणि जगातील कोणत्याही वातावरणात व्यवस्थित राहणारा हा अदिदासचा एकमेव चेंडू आहे. या चेंडूचे वजन ४३७ ग्रॅम असून, त्याची हवा शोषून घेण्याची क्षमता ०.२ टक्के असणार आहे. त्यामुळे आकार आणि वजन पावसातही समान राहणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा