क्लब फुटबॉलचा मोसम संपण्याच्या मार्गावर असतानाच फिफा विश्वचषकाची रणधुमाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पावसाच्या सरींच्या आगमनाबरोबरच पेनल्टी-शूटआऊट, फ्री-किक आणि गोलांच्या वर्षांवाने सर्वानाच चिंब भिजण्याची संधी १२ जून ते १३ जुलैदरम्यान ब्राझीलमध्ये रंगणाऱ्या फुटबॉल महासंग्रामाच्या निमित्ताने मिळणार आहे. जगभरातील ३२ संघ प्रतिष्ठेच्या फिफा विश्वचषकावर मोहोर उमटवण्यासाठी सज्ज झाले आहेत. पाच वेळा विश्वविजेतेपदावर नाव कोरणारा ब्राझील संघ घरच्या मैदानावर इतिहास घडवतो, की गतविजेता स्पेन संघ पुन्हा एकदा जागतिक फुटबॉलवर वर्चस्व गाजवतो, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचू लागली आहे. लिओनेल मेस्सी, नेयमार, ख्रिस्तियानो रोनाल्डो, वेन रूनी, फर्नाडो टोरेस, रॉबिन व्हॅन पर्सी, लुइस सुआरेझ यांच्यासारखे क्लब स्पर्धा गाजवणारे खेळाडू देशातर्फे कशी कामगिरी साकारतात, याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. २०१४च्या फिफा विश्वचषकातील आठ गटांतील संघांचा हा लेखाजोखा-

अ गट
ब्राझील जेतेपदासाठी दावेदार
फिफा विश्वचषकाची सुरुवातच ब्राझील आणि क्रोएशिया या दोन अव्वल संघांमध्ये होणाऱ्या लढतीने होणार आहे. ब्राझील जेतेपदासाठी दावेदार असल्यामुळे बाद फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना फारशी अडचण येणार नाही, पण बलाढय़ क्रोएशिया आणि तगडय़ा संघांना कोणत्याही क्षणी पराभवाचा धक्का देण्याची क्षमता असलेल्या मेक्सिकोच्या आव्हानाचा सामना ब्राझीलला करावा लागणार आहे. कॅमेरूनविरुद्ध ब्राझील, क्रोएशिया आणि मेक्सिकोला सहज विजय मिळवता येऊ शकतो. संपूर्ण देशाची जबाबदारी खांद्यावर असल्यामुळे साखळी फेरीत तरी ब्राझीलचे प्रशिक्षक लुईस फिलिप स्कोलारी यांच्यावर दडपण नाही. गेल्या वर्षी जगज्जेत्या स्पेनला नमवून कॉन्फडरेशन चषक पटकावल्यामुळे घरच्या चाहत्यांच्या ब्राझीलकडून अपेक्षा वाढल्या आहेत. थिआगो सिल्वा, डेव्हिड लुइझ, नेयमारसारखे बलाढय़ खेळाडू असल्यामुळे ब्राझीलचा विजयरथ रोखणे सर्वानाच कठीण जाणार आहे. लुका मॉड्रिक, मारियो मांझुकिकसारखे क्लब स्पर्धा गाजवणारे खेळाडू असल्यामुळे क्रोएशिया हा संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये नेहमीच ‘डार्क हॉर्स’ म्हणून ओळखला जातो. ब्राझील, क्रोएशिया हे दोन बलाढय़ संघ गटात असल्यामुळे मेक्सिकोची गोची झाली आहे. झेवियर हेर्नाडेझ, कालरेस वेला यांच्यावरच मेक्सिकोच्या आशा अवलंबून आहेत. गेल्या विश्वचषकात कॅमेरून संघाने अपेक्षेपेक्षा सुरेख कामगिरी केली होती, पण या वेळेला त्यांना बाद फेरी गाठणे अशक्य जाणार आहे.
रंगतदार सामना : ब्राझील वि. कॅमेरून, १२ जून
स्टार खेळाडू : नेयमार, मारियो मांझुकिक

ब गट
ग्रुप ऑफ डेथ
२०१०च्या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारे स्पेन आणि नेदरलँड्स तसेच बलाढय़ चिली आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामुळे ब गट हा ‘ग्रुप ऑफ डेथ’ म्हणून ओळखला जात आहे. सलग दोन वेळा युरोपीयन चषक आणि २०१०च्या विश्वचषकावर नाव कोरणारा स्पेन संघ कोणत्याही स्पर्धेत थेट विजेतेपदाच्या शर्यतीतच असतो. मात्र गेल्या वेळेला साखळी फेरीत त्यांना स्वित्र्झलडकडून पराभूत व्हावे लागले होते. नेदरलँड्स आणि चिलीसारखे दोन अव्वल संघ असल्यामुळे या गटातून कोणते दोन संघ बाद फेरी गाठतात, याची उत्सुकता लागून राहिली आहे. स्पेनकडे आंद्रेस इनियेस्टा, झाबी अलोन्सो, सर्जीओ रामोस, दिएगो कोस्टा, फर्नाडो टोरेस यांच्यासारख्या अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. प्रतिस्पर्धी संघांच्या बचावपटूंची भिंत कशी पार करायची, हे आर्येन रॉबेन आणि रॉबिन व्हॅन पर्सी यांना पक्के ठाऊक असले तरी नेदरलँड्सच्या बचावफळीत अननुभवी खेळाडूंचा समावेश आहे. २०१२च्या युरो चषकात सुमार कामगिरी केल्यामुळे या वेळेला नेदरलँड्स कशी कामगिरी साकारतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दक्षिण अमेरिकेतील अव्वल संघांमध्ये गणल्या जाणाऱ्या चिली संघात आर्टुरो विदाल, अ‍ॅलेक्सीस सांचेझ यांच्यासारखे युरोपीयन स्पर्धा गाजवणारे खेळाडू असल्यामुळे स्पेन, नेदरलँड्ससारख्या अव्वल संघांना कडवी लढत देण्याची क्षमता त्यांच्यात नक्कीच आहे. जगातील तीन सर्वोत्तम संघांशी मुकाबला करायचा असल्यामुळे ऑस्ट्रेलियाला या वेळी बाद फेरीतूनच घरचा रस्ता धरावा लागणार आहे. मात्र बलाढय़ संघांना नमवून त्यांनी बाद फेरी गाठली तर कांगारूंसाठी ती आतापर्यंतच्या फुटबॉल इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी ठरणार आहे.
रंगतदार सामना : स्पेन वि. नेदरलँड्स, १३ जून
स्टार खेळाडू : आंद्रेस इनियेस्टा, आर्येन रॉबेन

क गट
तुल्यबळ संघ
कोलंबिया, जपान, ग्रीस आणि आयव्हरी कोस्ट हे चारही तुल्यबळ संघ एकाच गटात असल्यामुळे बाद फेरीसाठी चांगलीच झुंज क गटात पाहायला मिळणार आहे. मात्र जागतिक दर्जाचे अव्वल खेळाडू संघात असल्यामुळे दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया संघाचे पारडे बाद फेरीसाठी जड मानले जात आहे. या पिढीतला सर्वोत्तम गुणवान संघ म्हणून कोलंबियाची ख्याती आहे. रादामेल फलकाव, जेम्स रॉड्रिगेझ, जॅक्सन मार्टिनेझ यांच्यासारख्या आक्रमकवीरांमध्ये कोणत्याही तगडय़ा संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे. अनुभवी बचावपटू तसेच युवा आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा असल्यामुळे कोलंबिया संघ समतोल आहे. आफ्रिकेतील सर्वोत्तम बलाढय़ संघ म्हणजे आयव्हरी कोस्ट, पण विश्वचषकात नेहमीच अपयशी ठरणाऱ्या आयव्हरी कोस्टला अखेरची विश्वचषक स्पर्धा खेळणारा महान खेळाडू दिदियर द्रोग्बाला गोड निरोप देण्यासाठी चांगली कामगिरी करावी लागणार आहे. कागदावर आयव्हरी कोस्टचा संघ बलाढय़ वाटत असला तरी त्यांच्याकडे कोलंबियासारखे जागतिक दर्जाचे खेळाडू नाहीत. त्यांची मदार वर्षांनुवर्षे द्रोग्बावरच राहिली आहे. जपानमधील गुणवत्ता प्रत्येक स्पर्धेगणिक सुधारत असून या वेळेला त्यांनी चांगला संघ स्पर्धेत उतरवला आहे. कैसुके होंडा, शिंजी कागावासारखे दर्जेदार खेळाडू त्यांनी घडवले आहेत. त्यामुळे दुसऱ्या स्थानासाठी त्यांना आयव्हरी कोस्टचे आव्हान पेलावे लागणार आहे. २००४च्या युरो चषकाचे जेतेपद पटकावून ग्रीसने सर्वानाच धक्का दिला होता, पण या गटातील हा सर्वात दुबळा संघ समजला जात आहे. स्टार खेळाडूंचा अभाव असणाऱ्या ग्रीसची भिस्त आक्रमक खेळावरच आहे.
रंगतदार सामना : आयव्हरी कोस्ट वि. जपान, १४ जून
स्टार खेळाडू : दिदियर द्रोग्बा, रादामेल फलकाव

ड गट
आश्चर्यकारक निकाल
उरुग्वे, इटली आणि इंग्लड हे तीन मातब्बर संघ एकाच गटात असल्यामुळे ड गटात आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळणार आहेत. बचाव, आक्रमकता याबाबतीत वरचढ असल्यामुळे उरुग्वेपेक्षा इटली संघ या गटात सरस ठरणार आहे. गियानलुइगी बफनसारखा गोलरक्षक आणि मारियो बालोटेली, गिऊसेप्पे रोस्सी यांच्यासारखे आक्रमकवीर असल्यामुळे इटली संघ या गटातून आरामात बाद फेरी गाठेल, असे चित्र आहे. विश्वचषकाच्या पात्रता फेरीत धडपडणारा उरुग्वे संघ विश्वचषकात मात्र नेहमीच चांगली कामगिरी करत आला आहे. २०१०च्या विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणाऱ्या उरुग्वे संघात लुइस सुआरेझ, दिएगो फोर्लान, दिएगो लुगानो यांच्यासारख्या अव्वल खेळाडूंमुळे उरुग्वेच्या बाद फेरीच्या आशा कायम राहणार आहेत. इंग्लंडकडून चाहत्यांना नेहमीच चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते, पण प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये इंग्लंड संघाची कामगिरी ढेपाळत चालली आहे. वेन रूनी, स्टीव्हन गेरार्ड यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंनाच आता करिश्मा दाखवावा लागणार आहे. कोस्टा रिकाचा संघ युवा खेळाडूंनी सजला असला तरी आक्रमणात ब्रायन रुइझ, अल्वारो सबारियो आणि जोएल कॅम्प्बेल यांच्यासारखे पर्याय त्यांच्याकडे आहेत.
रंगतदार सामना : इटली वि. इंग्लंड, १४ जून
स्टार खेळाडू :  मारियो बालोटेली, लुइस सुआरेझ

इ गट
जो जिता वही सिकंदर
स्वित्र्झलड, होंडुरास आणि इक्वेडोर हे तुल्यबळ संघ एकाच गटात असल्यामुळे इ गटात ‘जो जिता वही सिकंदर’ असे चित्र असणार आहे. फ्रान्ससारखा बलाढय़ संघ असल्यामुळे या गटात रंगतदार लढती पाहायला मिळतील. विश्वचषकाच्या पात्रता फेरीत बलाढय़ स्पेनचा सामना करावा लागल्यामुळे फ्रान्स दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. मात्र इ गटात फ्रान्स संघ बाद फेरीसाठी प्रबळ दावेदार आहे. फ्रान्स संघ अन्य गटात असता तर गेल्या वेळेप्रमाणे साखळी फेरीतच गारद होण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली असती. पण गटात कमकुवत संघ असल्यामुळे फ्रान्सची बाजू वरचढ आहे. स्वित्र्झलड संघ समतोल असला तरी त्यांच्याकडे मधल्या फळीत गोखान इनलेर, ब्लेरिम झेमाईली आणि वलोन बेहरामी तर ग्रानीट झाका आणि झेर्डान शाकिरी हे युवा खेळाडू आहेत. दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोरने पात्रता फेरीत उरुग्वेसारख्या संघाला पराभूत केले आहे. त्यामुळे त्यांनाही बाद फेरीच्या अपेक्षा बाळगता येतील. अँटोनियो व्हॅलेंसिया, जेफरसन माँटेरो तसेच ख्रिस्तियान बेनिटेझ यांच्यासारखे अव्वल खेळाडू त्यांच्यासाठी तारणहार बनू शकतात. कागदावर होंडुरास हा संघ गटातील कमकुवत असला तरी त्यांच्यात या तीन संघांना पराभूत करण्याची क्षमता नक्कीच आहे. अँडी नजार, रॉजर इस्पिनोझा, ऑस्कर गार्सिया यांच्यावर त्यांची मदार असेल.
रंगतदार सामना : स्वित्र्झलड वि. फ्रान्स, २० जून
स्टार खेळाडू :  फ्रँक रिबरी, करिम बेंझेमा

फ गट
मेस्सीची कमाल
जगातील सर्वोत्तम खेळाडू अशी ख्याती असलेल्या लिओनेल मेस्सीचा करिश्मा फ गटात पाहायला मिळणार आहे. मेस्सीसह अनेक स्टार खेळाडू अर्जेटिना संघात असल्यामुळे त्यांना बाद फेरी गाठणे कठीण जाणार नाही. मात्र दुसऱ्या क्रमांकासाठी चांगलीच रस्सीखेच असणार आहे. बार्सिलोनाकडून खेळताना गोलधमाका करणाऱ्या मेस्सीला २०१० विश्वचषक आणि २०११ कोपा अमेरिका स्पर्धेत देशाकडून चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याला प्रखर टीकेला सामोरे जावे लागले होते. या वेळी आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. गेल्या कित्येक विश्वचषक स्पर्धामध्ये नायजेरियाने चढउतारांचा प्रवास केला आहे. पण या वेळी पहिल्यांदाच विश्वचषकात सामील झालेला बोस्निया आणि हेझ्रेगोविना तसेच इराण हे दोन कमकुवत संघ असल्यामुळे नायजेरियाला दुसऱ्या क्रमांकावर मजल मारता येऊ शकते. नायजेरिया संघ विक्टर मोझेस, ब्राऊन इडेये आणि इमान्युएल एमिनेके यांच्यावर अवलंबून आहे. २०१० विश्वचषक आणि २०१२ युरो चषकाच्या मुख्य फेरीत खेळण्याची संधी थोडक्यात हुकली तरी अखेर बोस्निया आणि हेझ्रेगोविनाने विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न साकार केले. भक्कम बचावफळी आणि इडिन झेकोसारखा अव्वल आक्रमकवीर त्यांच्या ताफ्यात आहे. इराण संघाला कमकुवत लेखणे नायजेरिया तसेच बोस्निया आणि हेझ्रेगोविनाला महागात ठरू शकते. या दोन्ही संघांविरुद्ध किमान चार गुण मिळवून बाद फेरीचे दरवाजे ठोठावण्याची क्षमता इराणमध्ये नक्कीच आहे.
रंगतदार सामना : नायजेरिया वि. बो. हेझ्रेगोविना, २१ जून
स्टार खेळाडू :  लिओनेल मेस्सी, गोंझालो हिग्युएन

ग गट
बलाढय़ संघांसाठी खडतर मार्ग
जर्मनी, पोर्तुगाल, अमेरिका, घाना एकाच गटात समाविष्ट झाल्यामुळे बलाढय़ संघांसाठी खाचखळग्यांचा मार्ग असेच ग गटाचे वर्णन करावे लागेल. ब्राझील आणि स्पेनपाठोपाठ विश्वचषकासाठी दावेदार समजला जाणारा तिसरा संघ म्हणजे जर्मनी. जगातील अव्वल खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारे बास्तियन श्वाइनस्टायगर, लुकास पोडोलस्की, मेसूत ओझिल, फिलिप लॅम आणि मिरोस्लाव्ह क्लोस यांसारखे मातब्बर खेळाडू जर्मनी संघात असल्यामुळे बाद फेरीचा अडथळा ते सहज पार करतील. बाद फेरीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जर्मनीचा संघ केव्हापासूनच ब्राझीलमध्ये मुक्काम ठोकून आहे. पात्रता फेरीत पोर्तुगालला चमक दाखवता आली नसली तरी स्वीडनविरुद्धच्या प्ले-ऑफ सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोने चार गोल लगावून पोर्तुगालला विश्वचषकाचे तिकीट मिळवून दिले. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणारा रोनाल्डो आपल्यावरील अपेक्षांचे ओझे कितपत पेलवतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेला गेल्या दोन्ही विश्वचषक स्पर्धामध्ये घानाने घरचा रस्ता दाखवला होता. त्याचा वचपा काढण्याची संधी अमेरिकेला मिळणार आहे. पण जर्मनी आणि पोर्तुगाल हे दोन संघ गटात असल्यामुळे अमेरिकेसाठी बाद फेरीचा मार्ग खडतर असणार आहे. आफ्रिकेतील सर्वोत्तम संघ असलेल्या घानाला सध्या चांगली कामगिरी करता आलेली नाही. अव्वल खेळाडूंच्या दुखापती आणि स्टार खेळाडूंच्या निवृत्तीचा फटका घानाला बसणार आहे.
रंगतदार सामना : जर्मनी वि. पोर्तुगाल, १६ जून
स्टार खेळाडू :  ख्रिस्तियानो रोनाल्डो

ह गट
बेल्जियम, रशियासमोर सोपे आव्हान
दक्षिण कोरिया आणि अल्जेरियासारखे दुबळे संघ ह गटात असल्यामुळे बेल्जियम आणि रशिया यांना सहजपणे बाद फेरी गाठता येईल. जगातील सर्वोत्तम युवा फुटबॉलपटूंचा समावेश असलेला बेल्जियम संघ गटात अव्वल स्थानी झेप घेईल, असे चित्र आहे. इडेन हझार्ड, ख्रिस्तियान बेंटेके, मरौने फेलिआनी आणि विन्सेंट कोम्पानी यांच्यासारखे अव्वल खेळाडू असल्यामुळे बाद फेरीतही बेल्जियमकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. फॅबियो कपेलो यांनी प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रशिया संघाला नवी झळाळी मिळाली आहे. कपेलो यांनी संघात अननुभवी खेळाडूंना संधी दिली असली तरी सोपा ड्रॉ ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे. पात्रता फेरीत आशियातील दुबळ्या संघांचे आव्हान सहज पेलवल्यामुळे दक्षिण कोरिया संघ जागतिक स्तरावर कशी कामगिरी करतो, हे पाहणे मजेशीर ठरणार आहे. बाद फेरी गाठणे त्यांच्यासाठी अशक्यप्राय आव्हान असले तरी अल्जेरियावर विजय मिळवण्याची अपेक्षा त्यांना आहे. अल्जेरिया संघाची तुलना  फ्रान्सच्या तृतीय श्रेणी संघाशी केली जात आहे. सफिर तायदेर आणि इशक बेल्फोडिल यांच्यासारखे चांगले खेळाडू संघात असल्यामुळे ते रशिया किंवा बेल्जियमसारख्या बलाढय़ संघाला पराभवाचा धक्का देतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
रंगतदार सामना : बेल्जियम वि. रशिया, २२ जून
स्टार खेळाडू :  इडेन हझार्ड, विंसेंट कोम्पानी

Story img Loader