दर चार वर्षांनी होणारा फुटबॉलचा महाकुंभमेळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना चाहत्यांच्या नसानसांत हळूहळू फुटबॉलज्वर भिनू लागला आहे. यजमान ब्राझील आणि पात्रता फेरीतून स्थान मिळवणारे अन्य संघ असे ३२ संघ फिफा विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाले आहेत. या ३२ संघांची ओळख आजपासून तुमच्यासाठी
ब्राझील (गट-अ)
फिफा विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणजे ब्राझील. आतापर्यंत तब्बल पाच वेळा विश्वचषकावर मोहोर उमटवण्याची किमया साधणारा ब्राझील संघ सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. मुख्य प्रशिक्षक लुइझ फिलिप स्कोलारी यांच्या जोडीला बिग फिल प्रशिक्षक म्हणून लाभल्यामुळे आक्रमक खेळ करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ब्राझीलच्या विश्वचषकावर नाव कोरण्याच्या आशा उंचावल्या आहेत. २००२मध्ये ब्राझीलला पाचवा विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या बिग फिल यांनी ब्राझीलच्या प्रशिक्षकपदाच्या दुसऱ्या डावामध्ये घवघवीत यश मिळवले आहे. ७० टक्के सामने जिंकून देणाऱ्या बिग फिल यांचा करिश्मा या वेळी घरच्या मैदानावर दिसतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. २०१२मध्ये ब्राझीलच्या प्रशिक्षकपदी पुन्हा परतल्यानंतर स्कोलारी यांनी युवा फुटबॉलपटूंमधील गुणवत्ता ओळखून जुन्या, पण तंदुरुस्त नसलेल्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवत संघबांधणी केली. २०१३च्या कॉन्फेडरेशन चषकाचे जेतेपद पटकावून त्यांनी आपली मेहनत फळाला आणली. आता घरच्या मैदानावर मायदेशातील चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे त्यांना पेलवायचे आहे. ब्राझील हा संघ फक्त आक्रमक खेळासाठीच ओळखला जात नसून त्यांच्याकडे बचावाची भक्कम फळीही आहे. नेयमार, ऑस्कर यांच्यावर आक्रमणाची धुरा असली तरी डान्टे, डेव्हिड लुइझ आणि थिआगो सिल्वासारखे मजबूत बचावरक्षकही ब्राझीलकडे आहेत. स्पॅनिश लीग, इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये चमक दाखवणारे दिग्गज आक्रमकवीर ब्राझीलकडे असले तरी फ्रेड आणि जो हे ब्राझील लीगमध्ये आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवणारे खेळाडूही ब्राझीलसाठी तारणहार ठरू शकतात.
या विश्वचषकात सर्वाचे लक्ष लागले आहे ते नेयमारच्या जादुई कामगिरीकडे. बार्सिलोनाने करारबद्ध केल्यानंतर नेयमारची खरी गुणवत्ता सर्वासमोर आली. आतापर्यंत त्याने ब्राझीलसाठी ४७ सामन्यांत ३० गोल झळकावले आहेत. त्यामुळे घरच्या प्रेक्षकांसमोर नेयमारला पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. चेल्सीतर्फे खेळणारा ऑस्कर या मोसमात सध्या भलताच फॉर्मात आहे. त्यामुळे नेयमार आणि ऑस्कर दोन्ही बाजूने हल्ले चढवून प्रतिस्पध्र्यावर वरचढ ठरणार आहेत. प्रतिस्पध्र्याचे धारदार हल्ले परतवून लावण्याची क्षमता थिआगो सिल्वामध्ये नक्कीच आहे. युरोपमधील सर्वोत्तम बचावपटू म्हणून तो ओळखला जातो.

बलस्थाने आणि कच्चे दुवे
चेंडू घेऊन पुढे सरकत राहणे, ही ब्राझीलची भक्कम बाजू. स्कोलारी यांच्या सुरेख रणनीतीमुळे त्यांच्या कालावधीत ब्राझीलने २० सामन्यांत तब्बल ५२ गोल लगावले. मधल्या फळीत गुणवान खेळाडू असल्यामुळे नेयमार व हल्क हे गोल करण्याच्या संधी निर्माण करू शकतात. बायर्न म्युनिकसाठी लुइझ गुस्ताव्हो महत्त्वपूर्ण ठरला होता. ब्राझीलसाठीही त्याची जादू कायम राहील, अशी अपेक्षा आहे. मात्र नेयमार आणि हल्क यांच्यापैकी कुणी दुखापतग्रस्त झाला किंवा बंदी घातली तर त्यांची जागा कोण घेईल, हा प्रश्न आहे. दानी अल्वेस, मार्सेलो आणि राफिन्हा हे बचावाची धुरा सांभाळत असताना कायम पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे गोलरक्षक ज्युलियो सेसारवरील दडपण वाढत जाते.

अपेक्षित कामगिरी
यजमान ब्राझीलला ‘अ’ गटात सोपा ड्रॉ मिळाल्यामुळे ते गटात अव्वल स्थान मिळवतील, यात कोणतीही शंका नाही. मात्र क्रोएशियाशी त्यांना झुंज द्यावी लागणार आहे. मात्र बाद फेरीत त्यांना ‘ब’ गटातील स्पेन आणि नेदरलँड्स या बलाढय़ संघांचे खडतर आव्हान पेलावे लागणार आहे. २०१०च्या विश्वचषक स्पर्धेत ब्राझीलला नेदरलँड्सविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. मात्र स्पेनला त्यांनी कॉन्फेडरेशन चषकाच्या अंतिम फेरीत पराभूत केले होते. ब्राझीलने गेल्या १४ पैकी १३ सामने जिंकले असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. शिवाय घरच्या चाहत्यांचा पाठिंबा आणि अनुभवाची शिदोरी त्यांना चांगली कामगिरी करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. स्पेन आणि नेदरलँड्सचे आव्हान पार केले तर ब्राझीलला विश्वचषक जिंकण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

*फिफा क्रमवारीतील स्थान : ६

विश्वचषकातील कामगिरी
* सहभाग : २० वेळा (२०१४सह)
* जेतेपद : ५ (१९५८, १९६२, १९७०, १९९४, २००२)
*उपविजेतेपद : २ (१९५०, १९९८)
* तिसरे स्थान : २ (१९३८, १९७८)
*चौथे स्थान : १ (१९७४)
*उपांत्यपूर्व फेरी : ४ (१९५४, १९८६, २००६, २०१०)

संघ :
*गोलरक्षक : ज्युलियो सेसार, जेफरसन. बचावफळी : दानी अल्वेस, थिआगो सिल्वा, डेव्हिड लुइझ, मार्सेलो, डान्टे, राफिन्हा. मधली फळी : रामिरेस, ऑस्कर, पॉलिन्हो, लुइझ गुस्ताव्हो, बेर्नार्ड, फर्नाडिन्हो, विलियन. आघाडीवीर : नेयमार, हल्क, जो, फ्रेड.
*स्टार खेळाडू : नेयमार, ज्युलियो सेसार, दानी अल्वेस, थिआगो सिल्वा, हल्क
* व्यूहरचना : ४-३-३
*प्रशिक्षक : लुइस फिलिप स्कोलारी