फिफा विश्वचषक स्पर्धेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी ब्राझीलने अर्जेटिनाच्या दंगेखोर चाहत्यांना रोखण्याचे ठरवले आहे. सामन्यादरम्यान गोंधळ घालणारे आणि आवाज करणारे अर्जेटिनाचे चाहते आम्हाला नकोत. ब्राझीलमध्ये दंगा करणाऱ्या कोणत्याही चाहत्यांची गरज नाही, असे ब्राझीलचे क्रीडा मंत्री अल्डो रेबेलो यांनी सांगितले.
‘‘दंगेखोर चाहत्यांचा धोका टाळण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. मैदानात सारखी भांडणे करणारे अर्जेटिनाचे चाहते आम्हाला नकोत,’’ असेही रेबेलो यांनी सांगितले.
इराण आणि अफगाणिस्तानपेक्षा ब्राझीलची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती चांगली आहे, असे विधान काही आठवडय़ांपूर्वी करत रेबेलो यांनी नव्या वादाला तोंड फोडले होते.
फिफा विश्वचषकासाठी काही स्टेडियम्स अद्याप सज्ज नसल्याचे विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘मुदतीआधी स्टेडियममध्ये पायाभूत सोयीसुविधा उभारण्यात आम्ही कमी पडलो, हे मान्य आहे. पण लवकरच सर्व स्टेडियम्स फिफा विश्वचषकासाठी सज्ज होतील, असा विश्वास आहे.  काही स्टेडियम्सच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.’’

Story img Loader