अन्वय सावंत
जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आणि या खेळातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला आता केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. रविवारपासून कतार येथे सुरू होणाऱ्या या स्पर्धेत तब्बल ३२ संघांचा सहभाग असून जगभरातील फुटबॉल रसिकांना आघाडीच्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळेल. गतविजेत्या फ्रान्सचा जेतेपद आपल्याकडेच राखण्याचा मानस असला, तरी अन्य संघ त्यांच्या वर्चस्वाला धक्का लावत विश्वचषकावर आपले नाव कोरण्याचा प्रयत्न करतील. ‘फिफा’ विश्वचषकाच्या जेतेपदासाठी कोणते संघ दावेदार असतील, हे दृष्टिक्षेपात.
फ्रान्स
चार वर्षांपूर्वी रशियात झालेल्या ‘फिफा’ विश्वचषकाचे फ्रान्सने जेतेपद पटकावले होते. यंदा त्यांना जेतेपद आपल्याकडेच राखण्याची संधी असेल. मात्र, फ्रान्सच्या संघाला गेल्या काही काळात सर्वोत्तम कामगिरी करता आलेली नाही. गेल्या वर्षी ‘युरो’ अजिंक्यपद स्पर्धेत फ्रान्सचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले होते. त्यातच एन्गोलो कान्टे आणि पॉल पोग्बा हे फ्रान्सचे प्रमुख मध्यरक्षक दुखापतींमुळे यंदाच्या विश्वचषकाला मुकणार आहे. त्यामुळे अन्य खेळाडूंवर आपला खेळ उंचावण्याची जबाबदारी असेल. फ्रान्सच्या संघात किलियान एम्बापे, करीम बेन्झिमा, ऑलिव्हिएर जिरूड आणि अॅन्टोन ग्रीझमन असे दर्जेदार आघाडीपटू आहे. मात्र, त्यांच्या मध्यरक्षकांच्या गाठीशी आंतरराष्ट्रीय फुटबॉलचा फारसा अनुभव नाही.
- खेळाडूंवर लक्ष : किलियान एम्बापे, करीम बेन्झिमा, अॅन्टोन ग्रीझमन (तिघेही आघाडीपटू), हुगो लॉरिस (गोलरक्षक), राफाएल वरान (बचावपटू)
- जेतेपद : दोन वेळा (१९९८, २००८)
अर्जेटिना
सर्वकालीन सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेसीची ही अखेरची विश्वचषक स्पर्धा असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपल्या कर्णधाराला विश्वविजयासह निरोप देण्याचा अर्जेटिनाच्या संघाचा प्रयत्न असेल. मेसीचा समावेश असतानाही अर्जेटिनाला अनेक वर्षे जागतिक स्पर्धाच्या जेतेपदाने हुलकावणी दिली होती. मात्र, गेल्या वर्षी अर्जेटिनाने ‘कोपा अमेरिका’ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यामुळे अर्जेटिनाच्या संघाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. त्यातच अर्जेटिनाचा संघ गेले ३६ सामने अपराजित आहे. आता हीच लय कायम राखून तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे अर्जेटिनाचे लक्ष्य असेल.
- खेळाडूंवर लक्ष : लिओनेल मेसी, अॅन्जेल डी मारिया, लॉटारो मार्टिनेझ (तिघेही आघाडीपटू), रॉड्रिगो डी पॉल (मध्यरक्षक), लिसान्ड्रो मार्टिनेझ (बचावपटू)
- जेतेपद : दोन वेळा (१९७८, १९८६)
ब्राझील
‘फिफा’ विश्वचषकासाठी ब्राझीलचा संघ दावेदार नाही, असे आजवर घडलेले नाही. यंदाही ब्राझीलचा संघ जेतेपदाच्या शर्यतीत असेल. ब्राझीलचा संघ सध्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असून सर्वाधिक (पाच) विश्वविजेतेपदांचा विक्रमही त्यांच्याच नावे आहे. ब्राझीलच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे. विश्वचषकाच्या पात्रता फेरीत ब्राझीलचा संघ अपराजित राहिला. त्यामुळे विश्वचषकात ब्राझीलला नमवणे अन्य संघांना सोपे जाणार नाही. ब्राझीलची भिस्त प्रामुख्याने तारांकित आघाडीपटू नेयमारवर असेल. १२१ आंतरराष्ट्रीय सामन्यांत नेयमारच्या नावे ७५ गोल आहेत.
- खेळाडूंवर लक्ष : नेयमार, व्हिनिसियस ज्युनियर (दोघेही आघाडीपटू), थियागो सिल्वा (बचावपटू), कॅसेमिरो (मध्यरक्षक), अॅलिसन (गोलरक्षक)
- जेतेपद : पाच वेळा (१९५८, १९६२, १९७०, १९९४, २००२)
इंग्लंड
गेल्या विश्वचषकाची उपांत्य फेरी आणि त्यानंतर ‘युरो’ अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी..प्रशिक्षक गॅरथ साउथगेट यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडच्या संघाने गेल्या काही वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. परंतु कितीही चांगले खेळाडू असले, तरी ‘फिफा’ विश्वचषकांमध्ये मोक्याच्या क्षणी इंग्लंडची कामगिरी खालावते, हा त्यांचा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळेच ५५ वर्षांपासून इंग्लंडला विश्वविजयाने हुलकावणी दिली आहे. मात्र, आता इंग्लंडच्या खेळाडूंचा नवा इतिहास घडवण्याचा प्रयत्न असेल.
- खेळाडूंवर लक्ष : हॅरी केन, रहीम स्टर्लिग (दोघेही आघाडीपटू), डेक्लन राईस, फिल फोडेन (दोघेही मध्यरक्षक), काएल वॉकर (बचावपटू)
- जेतेपद : एकदा (१९६६)
जर्मनी
२०१४मध्ये विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर गेल्या विश्वचषकात साखळी फेरीतूनच स्पर्धेबाहेर होण्याची नामुष्की बलाढय़ जर्मनीवर ओढवली होती. त्यानंतर ‘युरो’ अजिंक्यपद स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत जर्मनीला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे १५ वर्षे प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्या योकिम लोव्ह यांच्या जागी हान्सी फ्लिक यांची निवड झाली. फ्लिक यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मनीची कामगिरी पुन्हा उंचावली. फ्लिक यांनी खेळाडूंना आक्रमक खेळ करण्यास प्रोत्साहन दिले आणि त्यांना सकारात्मक निकाल मिळाले. त्यामुळे कतार येथे होणाऱ्या विश्वचषकाच्या जेतेपदासाठी जर्मनीचा संघ प्रबळ दावेदार आहे. मात्र, त्यांना टिमो वेर्नर आणि मार्को रॉइस या जायबंदी आघाडीपटूंची उणीव भासू शकेल.
- खेळाडूंवर लक्ष : मॅन्युएल नॉयर (गोलरक्षक), अँटोनियो रुडिगा (बचावपटू), जॉशुआ किमिच (मध्यरक्षक), थॉमस मुलर, काय हावेट्झ (आघाडीपटू)
- जेतेपद : चार वेळा (१९५४, १९७४, १९९०, २०१४)
- अन्य सक्षम संघ : स्पेन, पोर्तुगाल, नेदरलँड्स, क्रोएशिया, बेल्जियम