फिफा विश्वचषकात कोस्टा रिकाचा संघ इतिहास घडवेल, असे कुणालाही वाटले नव्हते; पण विश्वचषकात फक्त चार वेळा सहभागी होणाऱ्या या दक्षिण अमेरिकेतील अवघ्या ५० लाख लोकसंख्या असलेल्या कोस्टा रिकाने ‘हम भी किसी से कम नहीं’ हे संपूर्ण जगाला दाखवून दिले. इटली, इंग्लंड आणि उरुग्वे या दिग्गज संघांच्या ‘ग्रुप ऑफ डेथ’मधून सहीसलामत बाहेर पडलेल्या कोस्टा रिकाने बाद फेरीत ग्रीसचा पेनल्टी-शूटआऊटमध्ये ५-३ असा पराभव केला. या विजयासह विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्याची करामत कोस्टा रिकाने केली आहे.
भक्कम बचाव असलेल्या ग्रीसविरुद्ध कोस्टा रिकाला पहिल्या सत्रात गोलचे खाते खोलता आले नव्हते, पण ब्रायन रुइझने मध्यंतरानंतर लगेचच अप्रतिम गोल करत कोस्टा रिकाला आघाडी मिळवून दिली. ६६व्या मिनिटाला कोस्टा रिकावर मोठे संकट उद्भवले. ऑस्कर डुआर्टेला रेफ्रींनी दुसरे पिवळे कार्ड दाखवल्यानंतर मैदान सोडावे लागले. त्यामुळे त्यांच्यावर १० जणांसह खेळण्याची नामुष्की ओढवली, पण त्याआधीच गोल झाल्याने कोस्टा रिकाने बचावावर अधिक भर दिला. अखेपर्यंत ग्रीसला गोल करण्याची कोणतीही संधी दिली नाही. याच आघाडीच्या बळावर कोस्टा रिका आगेकूच करणार असे वाटत असतानाच, दुखापतग्रस्त वेळेत ग्रीसच्या सॉक्रेटिस पापास्टाथोपौलसने गोल करून सामन्यात रंगत निर्माण केली. अतिरिक्त वेळेतही बरोबरीची कोंडी न फुटल्याने सामना पेनल्टी-शूटआऊटमध्ये गेला.
शूटआऊटमध्ये कोस्टा रिकाच्या सेल्सो बोर्गेस, ब्रायन रुइझ, गिआनकालरे गोंझालेझ, जोएल कॅम्प्बेल आणि मायकेल उमाना या पाचही जणांनी गोल लगावले, पण ग्रीसकडून कोन्सान्टिनोस मित्रोग्लोऊ, लाझारोस ख्रिस्तोडौलोपौलस आणि जोस होलेबास यांनी पहिले तीन गोल केल्यानंतर थिओफॅनिस जेकासची पेनल्टी हुकली. तीच ग्रीसचे उपांत्यपूर्व फेरीचे दरवाजे बंद करणारी ठरली. ही पेनल्टी अडवणारा गोलरक्षक केयलर नवास हा कोस्टा रिकासाठी हिरो ठरला.
कोस्टा रिकामध्ये जल्लोष
कोस्टा रिकाने पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठल्यामुळे संपूर्ण देशभर जल्लोष करण्यात आला. रविवार असल्यामुळे संपूर्ण कोस्टा रिकावासी रस्त्यावर उतरले होते. राजधानी सॅन जोस येथे जमलेल्या चाहत्यांनी हातात देशाचे झेंडे, खेळाडूंच्या जर्सी, डोक्यावर चित्रविचित्र वेशभूषा तसेच हॉर्न वाजवून आनंद साजरा केला. ‘‘देशात जणू भूकंप झाला आहे, असे वाटत आहे. आम्ही सर्व जण कोस्टा रिकाच्या ऐतिहासिक कामगिरीचा जल्लोष करण्यासाठी एकत्र जमलो आहोत,’’ असे एका चाहत्याने सांगितले.
फर्नाडो सांतोस निराश
एक पेनल्टी हुकल्याने ग्रीसचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे प्रशिक्षक फर्नाडो सांतोस निराश झाले आहेत. ग्रीसच्या संघासाठी नव्या प्रशिक्षकाची घोषणा काही दिवसांपूर्वीच ग्रीस फुटबॉल असोसिएशनने केली होती. त्यातच पेनल्टी-शूटआऊटच्या वेळी खेळाडूंसोबत मैदानावर जाण्यास सांतोस यांना रेफ्री बेन विल्यम्स यांनी मज्जाव केला. त्यामुळे सांतोस आणखीनच वैतागले. ‘‘अतिरिक्त वेळेनंतर मी खेळाडूंना पाणी देण्यासाठी मैदानावर जात होतो. कोस्टा रिकाचे प्रशिक्षक खेळाडूंसोबत होते, मग मी का जाऊ शकत नाही, असा प्रश्न मी रेफ्रींना विचारला. फिफाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरही रेफ्रींनी मला बाहेर जाण्यास सांगितले. अखेर स्टेडियमच्या आत जाऊन टीव्हीवरच मी पेनल्टी-शूटआऊटचा निकाल पाहिला,’’ असे सांतोस यांनी सांगितले.
उपांत्यपूर्व फेरी
नेदरलँड्स वि. कोस्टा रिका
स्थळ : एरिना फोंटे नोवा, साल्वाडोर
दिनांक : ६ जुलै
वेळ : मध्यरात्री १.३० वा.