लोकसभेच्या निवडणुकीत जशी नरेंद्र मोदी लाट उफाळून आली तशी फिफा विश्वचषक स्पर्धेत इक्वेडोरची प्रभावी लाट उसळण्याची शक्यता अधिक आहे. पात्रता फेरीत उरुग्वेसारख्या दादा संघाचे पानिपत केल्यानंतर काही सामने शिल्लक राखून इक्वेडोरने कॉनेमोल गटातून चौथ्या क्रमांकावर मजल मारून फिफा विश्वचषकवारी निश्चित केली. घरच्या मैदानावर सर्व सामने जिंकणाऱ्या इक्वेडोरचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला असून गरुडभरारी घेण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.
बाहेरच्या मैदानांवरील सामने जिंकण्यात इक्वेडोर संघ पात्रता फेरीत अपयशी ठरला असला तरी मुख्य स्पध्रेत मात्र बाद फेरीच्या इष्रेने ‘इ’ गटातील मातब्बर संघांवर तो भारी पडणार, असे चित्र आहे. अतिशय वेगवान खेळ आणि इतरांपेक्षा वेगळ्या धाटणीची शैली, यामुळे आघाडीवीर फॉर्मात असल्यास, इक्वेडोर संघ करिश्मा दाखवेल, अशी स्थिती आहे. संघातील सुसूत्रता, बाहेरच्या मैदानांवरील खराब फॉर्म, बचाव आणि मधल्या फळीत गुणवान खेळाडूंचा अभाव यामुळे इक्वेडोर संघाला दारुण पराभवालाही सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
२००२ साली फिफा विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या इक्वेडोरला दक्षिण कोरिया आणि जपानसारख्या अव्वल संघांबरोबर झुंजावे लागले. मात्र त्यांचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले. २००६मध्ये जर्मनीत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत आपली घोडदौड दुसऱ्या फेरीपर्यंत नेली. यजमान जर्मनीनंतर गटात दुसरे स्थान पटकावत त्यांनी दिमाखात दुसरी फेरी गाठली. आता या वेळी मोठी झेप घेण्याचे उद्दिष्ट त्यांनी आखले आहे. इक्वेडोरच्या या अभियानाची मुख्य भिस्त असणार आहे ती अँटोनियो व्हॅलेंसिया आणि जेफरसन माँटेरो यांच्यावर. मँचेस्टर युनायटेडतर्फे खेळणारा व्हॅलेंसिया हा इक्वेडोरचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. वेग, कौशल्य आणि ऊर्जा याच्या जोरावर प्रतिस्पध्र्याचा भक्कम बचाव भेदण्याची ताकद त्याच्यात आहे. व्हॅलेंसिया आणि माँटेरो ही जोडी आक्रमणात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. २४ वर्षीय माँटेरोचे पदलालित्य आणि ड्रिब्लिंगचे कौशल्य अप्रतिम आहे. प्रशिक्षक रेइनाल्डो रुएडा यांनी युवा खेळाडूंना संघात समाविष्ट करून आपल्या रणनीतीद्वारे इक्वेडोरला आश्चर्यकारक निकाल मिळवून दिले आहेत. ‘ला ट्रि’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इक्वेडोरला ते या वेळच्या विश्वचषकात एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील, अशी आशा त्यांच्याकडून बाळगली जात आहे.
इक्वेडोर (इ-गट)
फिफा क्रमवारीतील स्थान : २८
विश्वचषकातील कामगिरी
*सहभाग : ३ वेळा (२०१४ सह)
* दुसरी फेरी : २००६
संभाव्य संघ
गोलरक्षक : अलेक्झांडर डॉमिंगेझ, मॅक्सिमो बँगुएरा, एड्रियन बोने. बचावफळी : जॉर्ज गुआगुआ, गॅब्रियल अकिलियर, ऑस्कर बागुई, जुआन कार्लोस पॅरेडेस, फ्रिक्सन इरेझो, वॉल्टर आयोवी, ख्रिस्तियान रामिरेझ, जॉन नार्वाएझ. मधली फळी : प्रेडो क्विनोनेझ, लुइस फर्नाडो सारितामा, कार्लोस ग्रुएझो, अँटोनियो व्हॅलेंसिया, सेगुंडो कॅस्टिलियो, ख्रिस्तियान नोबोआ, रेनाटो इबारा, एडिसन मेंडेझ, ओस्वाल्डो िमडा, मायकेल अरोयो, फिडेल मार्टिनेझ. आघाडीवीर : अर्माडो विला, जेफरसन माँटेरो, जेमी अयोवी, इनेर व्हॅलेंसिया, जोआओ रोजास, फेलिपे सेसाडो, ख्रिस्तियान पेनिला, अँजेल मेना.
* स्टार खेळाडू : अँटोनियो व्हॅलेंसिया, ओस्वाल्डो िमडा, ख्रिस्तियान नोबोआ, जेफरसन माँटेरो.
* व्यूहरचना : ४-१-४-१ किंवा ४-४-२
* प्रशिक्षक : रेइनाल्डो रुएडा.
बलस्थाने आणि कच्चे दुवे
अप्रतिम पासेस आणि क्रॉसिंगचा खेळ करणाऱ्या अँटोनियो व्हॅलेंसिया आणि जेफरसन माँटेरो यांच्यावर इक्वेडोरची मदार असणार आहे. गोल करण्याच्या संधी निर्माण करण्यात पटाईत असलेल्या या दोघांमुळे इक्वेडोरच्या बाद फेरीच्या आशा उंचावल्या आहेत. गुणवान पण असातत्यपूर्ण आघाडीवीर अशी अँटोनियो व्हॅलेंसियाची ओळख आहे. चेंडूवरील पदलालित्य आणि अप्रतिम कौशल्य यामुळे तो प्रतिस्पर्धी बचावपटूंसाठी धोकादायक ठरणार आहेत. गेल्या १६ सामन्यांपैकी फक्त एकाच सामन्यात इक्वेडोरला एकपेक्षा जास्त गोल लगावता आले आहेत. गोल करण्यासाठी धडपडणे, हीच त्यांच्यासाठी कमकुवत बाजू ठरणार आहे. इक्वेडोर संघात दर्जेदार बचावपटू आणि मधल्या फळीतील खेळाडूंचा अभाव आहे. महत्त्वाच्या सामन्यात नांगी टाकणे, हे त्यांच्या खेळाचे वैशिष्टय़ आहे. पात्रता फेरीत बाहेरच्या मैदानावरील सामन्यात त्यांनी पाच पराभव, तीन वेळा बरोबरी पत्करली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा