रविवारी १८ डिसेंबर रोजी कतारमधील लुसेल स्टेडियमवर सर्वात मोठा अंतिम सामना होणार आहे. फ्रान्स आणि अर्जेंटिना आमनेसामने, फिफा विश्वचषक २०२२ चे विजेतेपद पणाला लागणार आहे. एकीकडे अर्जेंटिना ३६ वर्षांपासून सुरू असलेला दुष्काळ संपवण्याची वाट पाहत आहे, तर दुसरीकडे फ्रान्स सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावणार आहे. लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाला सामोरे जाणे फ्रान्ससाठी सोपे नाही आणि त्याच्यासाठी हे आव्हान खेळाडूंच्या फिटनेसमुळे आणखी कठीण झाले आहे. फ्रेंच मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्रान्स संघात व्हायरसच्या घुसखोरीमुळे अनेक प्रमुख खेळाडू आजारी पडले आहेत.
फिफा विश्वचषक २०२२च्या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी खेळला जाणार असून या सामन्यात फ्रान्स आणि अर्जेंटिना हे दोन बलाढ्य लुसेल स्टेडियमवर भिडणार आहेत. या सामन्यात कोण वरचढ ठरेल याची चर्चा सुरू असताना फ्रान्सला मोठा धक्का बसला आहे. दोन वेळेच्या विश्वविजेत्या संघाचे काही खेळाडू आजारी पडले आहेत. या अतिमहत्वाच्या सामन्याला काही तासांचा अवधी शिल्लक आहे.
फ्रेंच न्यूज पोर्टल ले इक्विपच्या मते, किंग्सले कोमन, इब्राहिमा कोनाटे आणि राफेल वाराने हे ते खेळाडू आहेत जे एका व्हायरसच्या विळख्यात आले आहेत. यांनी फ्रान्सच्या उर्वरित संघापासून दूर सराव केला. व्हायरसमुळे त्यांची विश्वचषक अंतिम सामन्याची तयारी विस्कळीत झाली आहे. हे तीनही बचावपटू उपांत्य फेरीत मोरोक्कोविरुद्धच्या सुरुवातीच्या अंतिम ११ चा भाग होते आणि या जोडीने मोरोक्कोचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडून संघाला २-० असा विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.
अंतिम सामन्याआधी तीन खेळाडू आजारी
अहवालानुसार, व्हेरनमध्ये सौम्य लक्षणे आहेत परंतु कोनाटे दिवसभर त्याच्या खोलीतच राहिला आणि बाहेरही आला नाही, ज्यामुळे फ्रान्सचा संघ आणि चाहते चिंतेत पडले असावेत. खेळाडूंच्या प्रकृतीबाबत फ्रान्स आधीच तणावात आहे. अंतिम सामन्यापूर्वीच संघाचा आणखी एक बचावपटू डेएट उपमेकानो, मिडफिल्डर अॅड्रियन रॅबिओ आणि विंगर किंग्सले कोमन हे देखील आजारी आहेत. ते मोरोक्कोविरुद्ध सुद्धा उपांत्य फेरीतील सामन्यात खेळू शकले नाहीत. जरी उपमेकानो आणि रॅबिओ बरे झाले आणि सरावासाठी परतले, तरीही कोमनने प्रशिक्षण सत्र चुकवले.
खेळाडू बरे होतील अशी प्रशिक्षकाची अपेक्षा
संघ व्यवस्थापक डिडिएर देशन यांनी कोणतीही चिंता नाही असे नाही पण खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही सांगितले की खेळाडूंनी प्रशिक्षणापासून दूर राहावे, जेणेकरून संसर्ग इतर खेळाडूंमध्ये पसरू नये. रविवारी अर्जेंटिनाविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी रॅबिओ आणि उपमेकानो उपलब्ध होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. ही स्पर्धा सुरू होण्याआधीच फ्रान्सचे काही खेळाडू दुखापतग्रस्त झाले आणि विश्वचषकातून बाहेर झाले. त्यामध्ये पॉल पोग्बा, एनगोलो कांटे आणि करिम बेंझेमा यांचा समावेश आहे. तसेच पहिल्याच सामन्यात लुकास हर्नांडेज दुखापतग्रस्त होत स्पर्धेबाहेर झाला. एवढ्या अडचणी असूनसुद्धा फ्रांस सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पोहोचला.