नेदरलँड्सने ‘ब’ गटातले वर्चस्व कायम राखत चिलीवर २-० मात केली. नेदरलँड्सने गटविजेत्याच्या थाटात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे, तर या पराभवामुळे चिलीला आता बाद फेरीत ब्राझीलचा सामना करावा लागणार आहे.
बदली खेळाडू म्हणून आलेल्या लिरॉय फेरच्या (७७व्या मिनिटाला) गोलनेच सामन्याला कलाटणी मिळाली. अतिरिक्त वेळेत आर्येन रॉबेनच्या प्रयत्नपूर्वक पासवर मेमफिस डेपेयने अचूकतेने गोल करत नेदरलँड्सला शानदार विजय मिळवून दिला. योग्य वेळी नव्या खेळाडूला संधी देण्याचा प्रशिक्षक व्हॅन गाल यांचा निर्णय बदली खेळाडू लेरॉय फेरने सार्थ ठरवला. गोलसाठी अथक प्रतीक्षा कराव्या लागलेल्या मुकाबल्यात ७५व्या मिनिटाला अनुभवी वेस्ले स्नायडरच्या जागी फेर मैदानावर उतरला आणि दोनच मिनिटांत त्याने संघाचा गोलदुष्काळ संपवला. रॉबेनच्या कॉर्नरवर फेरने जोरदार हेडरद्वारे गोल करताच प्रेक्षकातल्या नारिंगी समूहाने एकच जल्लोष केला.
६५व्या मिनिटाला सँचेझने नेदरलँड्सच्या मेडलेला भेदत गोलचा जोरदार प्रयत्न केला, मात्र क्लिइन्सनने हा प्रयत्न रोखला. सँचेझला धक्का दिल्याप्रकरणी नेदरलँड्सच्या डेलय ब्लाइंडला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. ५६व्या मिनिटाला चिलीच्या सँचेझने केलेला गोलचा प्रयत्न गोलपोस्टच्या दुरुनच गेला. रॉबेनचा झंझावात पहिल्या टप्प्यात रोखण्यात त्यांनी यश मिळवले. ४०व्या मिनिटाला नेदरलँड्सचा गोलचा प्रयत्न थोडक्यात हुकला. आर्येन रॉबेनने अर्धरेषेवरून चेंडूवर ताबा मिळवला. चिलीच्या खेळाडूंना चकवत चेंडू गोलपोस्टच्या दिशेने नेला. डाव्या पायाने त्याने केलेला गोलचा प्रयत्न गोलपोस्टच्या बाजूने गेला. ३५व्या मिनिटाला रॉबेनने सुरेख फ्री किक घेतली. स्टेफान डी व्रिजने यावर हेडरद्वारे केलेला गोलचा प्रयत्न गोलपोस्टच्या वरून गेला. २६व्या मिनिटाला स्नायजरने केलेला प्रयत्न विफल ठरला. २२व्या मिनिटाला अलेक्स सँचेझच्या शैलीदार कॉर्नरचा फटका फेलिपे गुटिरेझने गोलपोस्टमध्ये नेण्यासाठी प्रयत्न केला मात्र तो क्रॉसबारवर आदळला. २०व्या मिनिटाला वेस्ले स्नायडरने चिलीच्या वर्गासला धक्का दिल्याने चिलीला फ्री किकची संधी मिळाली, मात्र त्यांनी ही संधी वाया घालवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा