दोहा : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत बुधवारी तंत्रपूर्ण खेळाचे सुरेख प्रदर्शन करताना स्पेनने इ-गटात झालेल्या सामन्यात कोस्टा रिकाचा ७-० असा धुव्वा उडवला. अर्जेटिना, जर्मनी अशा बलाढय़ संघांची अपयशी सुरुवात होत असतानाच स्पेनने आपल्या मोहिमेस गोल सप्तकाने प्रारंभ केला. सामन्याच्या ११व्या मिनिटाला डॅनी ओल्मोने केलेल्या गोलने सुरु झालेला स्पेनचा गोलधडाका अखेपर्यंत कायम राहिला. मार्को असेन्सियो (२१व्या मिनिटाला), फेरन टोरेसने (३१ आणि ५४व्या मि.), गावी (७४व्या मि.), कार्लोस सोलेर (९०व्या मि.) आणि अल्वारो मोराटा (९०+२ मि.) यांनीही स्पेनसाठी गोल केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अचूक पास आणि तंत्रशुद्ध खेळ हा स्पेनचा लौकिक या सामन्यातही दिसून आला. संतुलित वेग आणि चेंडूवरील नियंत्रण याचा सुरेख समन्वय साधून त्यांनी आपले वर्चस्व मिळविले. स्पेनकडून नोंदवलेले सातही गोल म्हणजे परिपूर्ण नियोजनाचा दाखला होता. कोस्टा रिकाच्या गोलपोस्टमध्ये धडक मारल्यावर आपला खेळाडू हेरून त्यांनी पास दिले आणि गोल केले. त्यांच्या विजयाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे १८ वर्षीय गावी हा विश्वचषक स्पर्धेत पेलेंनंतर सर्वात लहान वयात गोल करणारा खेळाडू ठरला. पेलेंनी १९५८ मध्ये स्वीडनविरुद्धच्या अंतिम सामन्यात गोल केला होता. तेव्हा पेले १७ वर्षे २४९ दिवसांचे होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup football tournament spain goal against costa rica ysh