सात वेळा विश्वचषकाची अंतिम फेरी (तीन वेळा जेतेपद आणि चार वेळा उपविजेतेपद), पाच वेळा उपांत्य फेरीत धडक, गेल्या दोन्ही वेळेला तिसऱ्या क्रमांकावर समाधान अशी प्रतिभावान कारकीर्द असतानाही जर्मनीला गेल्या २४ वर्षांमध्ये जेतेपदाने कायम हुलकावणी दिली आहे. मात्र स्टार खेळाडूंनी सुसज्ज अशा जर्मनीला आता २०१४मध्ये फिफा विश्वचषकाचे जेतेपद पटकावून इतिहास घडवण्याची संधी आहे. १९५४मध्ये पहिल्यांदा विश्वविजेते ठरल्यानंतर गेल्या २४ वर्षांपासून जर्मनीला चौथ्या विश्वचषकाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. मात्र आक्रमण, बचाव अशा सर्वच आघाडय़ांवर कमालीची सुधारणा करत जर्मनीचा संघ जेतेपदांचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाला आहे.
जर्मनी संघ नेहमीच फिफा विश्वचषकाच्या प्रबळ दावेदारांमध्ये गणला जातो. या वेळी ते तिसऱ्या स्थानाची नामुष्की टाळण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. जागतिक स्तरावर आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवणारे सुपरस्टार खेळाडू, प्रभावी आक्रमक शैली यामुळे जर्मनीचा संघ या वेळीही विजेतेपदाचा दावेदार आहे. सलग १५व्यांदा फिफा विश्वचषकाच्या मुख्य फेरीत स्थान मिळवताना जर्मनीने पात्रता फेरीत सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले. पात्रता फेरीत नऊ विजय आणि एक सामना बरोबरीत सोडवणारा जर्मनी हा दुसऱ्या क्रमांकाचा संघ ठरला. स्वीडन, ऑस्ट्रिया, आर्यलड, कझाकस्तान आणि फरोए आर्यलड या संघांवर वर्चस्व गाजवून क गटात अव्वल स्थान पटकावत जर्मनीने दिमाखात २०१४ फिफा विश्वचषकासाठी स्थान मिळवले.
जर्मनीचा अव्वल खेळाडू मिरोस्लाव्ह क्लोस फिफा विश्वचषकात सर्वाधिक गोलांचा ब्राझीलच्या रोनाल्डोचा (१५ गोल) विक्रम मोडीत काढण्याच्या उंबरठय़ावर आहे. सलग चौथ्यांदा फिफा विश्वचषकात खेळणाऱ्या मिरोस्लाव्ह क्लोसने २००२मध्ये पाच, २००६मध्ये पाच आणि २०१०मध्ये चार गोल लगावून आपल्या खात्यावर १४ गोलांची नोंद केली आहे. जर्मनीच्या आक्रमणाची मदार त्याच्यावरच असून त्याला लुकास पोडोलस्की आणि केव्हिन वोलांड यांची साथ लाभणार आहे. मधल्या फळीत मारियो गोएट्झे, सामी खेदिरा, टोनी क्रूस, थॉमस म्युलर, मेसूत ओझिल आणि बास्तियन श्वाइनस्टायगर यांच्यासारखे अव्वल क्लबमध्ये चमकणारे दिग्गज खेळाडू आहेत. कर्णधार फिलिप लॅम म्हणजे चीनची भिंतच. प्रतिस्पध्र्याचा बचाव रोखण्याचे तंत्र त्याला चांगलेच अवगत आहे. शिस्तबद्ध नियोजन, कल्पकता, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता, संघात कायम बदल करत राहण्याचे डावपेच, युवा खेळाडूंवरील विश्वास आणि खेळातील विविधता अशा गुणांमुळे प्रशिक्षक जोकिम लो यांनी जर्मनीला यशोशिखरावर नेले आहे. पण जेतेपदाचा दुष्काळ मिटवण्याची संधी त्यांच्यासमोर आहे.
जर्मनी (ह-गट)
फिफा क्रमवारीतील स्थान : २
विश्वचषकातील कामगिरी
*सहभाग : १७ वेळा (२०१४सह)
संभाव्य संघ
*गोलरक्षक :मॅन्यूएल न्यूअर, रोमन वेडेनफेलर, रॉन-रॉबर्ट झिएलेर. बचावफळी : जेरोम बोटेंग, इरिक डर्म, केव्हिन ग्रॉसक्रुएट्झ, बेनेडिक्ट होवेडेस, मॅट्स हमेल्स, फिलिप लॅम (कर्णधार), पेर मेर्टेसॅकर, श्कोड्रान मस्तफी, मार्सेल स्मेल्झर. मधली फळी : ज्युलियन ड्राक्सलर, मटियास जिंटेर, मारियो गोएट्झे, ख्रिस्तोफर क्रॅमेर, सामी खेदिरा, टोनी क्रूस, थॉमस म्युलर, मेसूत ओझिल, मार्को रेऊस, आंद्रे स्करले, बास्तियन श्वाइनस्टायगर. आघाडीवीर : मिरोस्लाव्ह क्लोस, केव्हिन वोलांड, लुकास पोडोलस्की.
*स्टार खेळाडू : फिलिप लॅम, थॉमस म्युलर, मॅन्यूएल न्यूअर, मिरोस्लाव्ह क्लोस, मेसूत ओझिल, लुकास पोडोलस्की, बास्टियन श्वाइनस्टायगर.
*व्यूहरचना : ४-४-२, ४-२-३-१ किंवा ४-३-१-२
*प्रशिक्षक : जोकिम लो
बलस्थाने आणि कच्चे दुवे
भक्कम बचाव, खेळाची अद्वितीय शैली, जबरदस्त नियोजन यामुळे जर्मनी संघ कायम इतरांपेक्षा सरस ठरत आला आहे. तांत्रिक खेळ, खेळाडूंची शारीरिक क्षमता, खेळातील बारकाव्यांची अचूक माहिती ही जर्मनीची भक्कम बाजू आहे. विश्वचषकात खेळताना जर्मनीच्या मागे कायम खेळाडूंच्या दुखापतींचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे या वेळी त्यांना याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. फिलिप लॅम आणि बास्टियन श्वाइनस्टायगर यांच्याकडे नेतृत्वगुणांचा अभाव असल्यामुळे जर्मनीला २०१० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्पेनकडून तर २०१२ युरो चषकाच्या उपांत्य फेरीत इटलीकडून पराभूत व्हावे लागले. जर्मनीचा बचाव भक्कम असला तरी शेवटच्या क्षणी गोल स्वीकारण्याच्या वृत्तीमुळे बलाढय़ संघांसमोर त्यांना पराभवाचा धक्काही सहन करावा लागू शकतो. मिरोस्लाव्ह क्लोस याला विश्वचषकातील सर्वाधिक गोलांचा विक्रम रचण्याची संधी आहे. मात्र विश्वचषकादरम्यान त्याचे वय ३६ होणार असून जर्मनीला त्याच्या जागी अद्याप योग्य पर्याय सापडलेला नाही.
अपेक्षित कामगिरी
ह गटात पोर्तुगाल, अमेरिका आणि घानासारखे संघ असल्यामुळे हा गट ‘ग्रूप ऑफ डेथ’ म्हणून ओळखला जात आहे. मात्र जर्मनीचा संघ या तिन्ही संघांना पुरून उठेल, यात कोणतीही शंका नाही. ह गटात अव्वल स्थानावर जर्मनीची दादागिरी असणार आहे. मात्र दुसऱ्या फेरीत जर्मनीला रशिया किंवा बेल्जियम यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या दोन्ही संघांवर मात करून जर्मनीचा संघ उपांत्यपूर्व फेरीत मजल मारेल, अशी शक्यता आहे. मात्र उपांत्यपूर्व फेरीत त्यांना अर्जेटिना आणि फ्रान्ससारख्या मातब्बर संघांशी दोन हात करावे लागतील. लिओनेल मेस्सी सुसाट सुटला तर त्याचा झंझावात रोखणे जर्मनीला कठीण जाऊ शकते. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीची लढत ही जर्मनीसाठी ‘करो या मरो’ची लढाई असणार आहे. उपांत्य फेरीत जर्मनीसमोर ब्राझील, स्पेन किंवा नेदरलँड्ससारखे दिग्गज संघ असणार आहेत. त्यामुळे जर्मनीचा संघ या वेळी कितपत मजल मारतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
इतिहास घडवणार?
सात वेळा विश्वचषकाची अंतिम फेरी (तीन वेळा जेतेपद आणि चार वेळा उपविजेतेपद), पाच वेळा उपांत्य फेरीत धडक, गेल्या दोन्ही वेळेला तिसऱ्या क्रमांकावर समाधान...
First published on: 29-05-2014 at 01:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup germany eager to end third place curse