फुटबॉल हा जगातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या लोकांच्या नसानसात भिनलेला खेळ आहे. विश्वचषक स्पर्धा असो किंवा युरोपियन लीग, अशा स्पर्धामध्ये भाग घेणारे खेळाडू हे त्यांच्या चाहत्यांसाठी देवच असतात. लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यासारख्या खेळाडू म्हणजे अवघ्या फुटबॉलविश्वासाठी दैवतच. या खेळाडूंचे पोशाख, केशरचना एवढेच नव्हे तर हे खेळाडू कोणते बूट वापरतात, याबाबतही अब्जावधी चाहत्यांमध्ये चर्चा असते.
चांभाराचे लक्ष तुमच्या पायाकडे असते असे म्हटले जाते. फुटबॉलबाबतही असेच पाहायला मिळते. या खेळाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वच स्पर्धामध्ये केवळ चाहते नव्हे तर बूट उत्पादक कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारीही नामवंत खेळाडूंच्या पायांकडेच पाहत असतात. मेस्सी, रोनाल्डो यांच्यासारखे खेळाडू बुटांच्या साहाय्याने किती वेगात धाव घेतात, कशी किक मारतात याकडेच त्यांचे लक्ष असते.
या खेळामध्ये बुटांचा उपयोग ही काही नवीन गोष्ट नाही. १५२६ मध्ये इंग्लंडचा राजा हेन्री यांच्याकरिता फुटबॉलची जोडी तयार करण्यात आल्याची इतिहासात नोंद आहे. १९व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये फुटबॉल या खेळास चालना मिळाली. त्या वेळी काम करताना जे बूट वापरत असत, त्याच बुटाने लोक फुटबॉल खेळत असत. हे बूट थोडे जड होते, त्यामुळे खेळल्यानंतर पाय दुखत असत. त्यामुळे खेळण्यासाठी चांगले बूट तयार करण्याची संकल्पना पुढे आली. पुढच्या टोकाला स्टीलचे आवरण, घोटय़ाला सुरक्षा मिळेल अशी सुविधा व लांब नाडय़ा असलेले बूट तयार करण्यात आले. या बुटांना तळपायाला खिळे (स्टड्स) ठोकलेले असायचे. हे बूट जाड कातडय़ांनी तयार केले जात असत. त्याचे वजन साधारणपणे अर्धा किलो होते. बूट ओले झाल्यास त्याचे वजन एक किलोपर्यंत जात असे.
खेळाची लोकप्रियता अन्य देशांमध्ये पोहोचू लागल्यानंतर अनेक बूट कंपन्याही फुटबॉलसाठी लागणाऱ्या बुटांचे उत्पादन करण्यात पुढे येऊ लागल्या. गोला, ह्य़ुमेल, वाल्सपोर्ट आदी कंपन्यांचे त्या वेळी बूट लोकप्रिय होते. १९४० पर्यंत फुटबॉलच्या बुटांमध्ये थोडेफार बदल होत गेले. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक प्रगत देशांमध्ये बुटांचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन सुरू झाले. १९५४मध्ये अदी डॅसलर यांनी स्क्रू असलेल्या स्टड्सचा उपयोग बुटांसाठी सुरू केला. त्याचा फायदा खेळाडूंना विश्वचषक स्पर्धेत झालेल्या पावसात ओलसर मैदानांवर खेळताना झाला. अडॉल्फ डॅसलर याने या बुटाचा उपयोग केला मात्र त्याचा भाऊ रुडॉल्फ याला हा बूट फारसा काही आवडला नाही व त्याने स्वत:च बूट उत्पादन करण्याचे ठरविले. त्याच्या संकल्पनेतून प्युमा ही कंपनी जन्मास आली. दरम्यानच्या काळात दक्षिण अमेरिकन देशांमध्येही थोडेसे हलके व लवचिक बूट तयार करण्यास प्रारंभ झाला. १९६० नंतर बूट उत्पादन तंत्रात खूपच क्रांती झाली. कमी कट असलेल्या बुटांच्या उत्पादनाला गती आली. त्याचा फायदा अनेक युरोपियन व दक्षिण अमेरिकन देशांच्या खेळाडूंना झाला. मित्रे, जोमा, अॅसिक्स आदी अनेक कंपन्यांनीही बूट उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रीत केले.
हलक्या वजनाबरोबरच रंगीत बुटांची लोकप्रियता १९७० नंतर अनेक देशांमध्ये वाढू लागली. आदिदास या ख्यातनाम कंपनीसह अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी फुटबॉलच्या बुटांच्या उत्पादनास प्राधान्य दिले. बूट अधिकाधिक आकर्षक कसे होतील यावर अधिक भर देण्यात आला. त्याचबरोबर आपल्या बुटांना मागणी मिळावी म्हणून नामवंत खेळाडूंना पुरस्कृत करण्याच्या प्रक्रियेसही वेग आला. १९८० नंतर दोन दशके आदिदास कंपनीने फुटबॉलच्या बुटांचे उत्पादन क्षेत्रात निर्विवाद मक्तेदारी मिळविली. ऑस्ट्रेलियन डिझायनर क्रेग जॉन्स्टोन यांनी आदिदास प्रिडेटर कंपनीकरिता फुटबॉल बुटांचे विशेष डिझाईन तयार केले. उम्ब्रो, लोटो, केल्मे आदी कंपन्यांनीही बूट उत्पादनात हळूहळू आपले बस्तान बसविले.
मैदानावर धावताना तोल सांभाळता यावा यासाठी बुटाच्या तळपायाला वेगळ्या स्वरूपाचा सोल बसविण्याचे तंत्रज्ञान १९९० नंतर अधिक लोकप्रिय झाले. १९९४ मध्ये प्रिडेचर कंपनीने असे बूट बाजारात आणले आणि अवघ्या काही दिवसात त्यांच्या उत्पादनाला विलक्षण प्रतिसाद मिळाला. २००६मध्ये लेझर तंत्रज्ञानाचा उपयोगही सुरू झाला. त्यामध्ये अव्वल दर्जाचे खेळाडू हाच केंद्रबिंदू मानून बूट तयार करण्यास सुरुवात झाली. हल्लीच्या काळात बूट हे वजनाने अधिकाधिक हलके कसे राहतील यावर भर देण्यात आला आहे. आदिदास, नायके, प्युमा, रिबॉक आदी अनेक कंपन्यांमध्ये बुटांचे उत्पादन क्षेत्रात मक्तेदारी गाजविण्यासाठी प्रयत्न होत आहे.
बूट नसल्यामुळे भारताची विश्वचषकाची संधी हुकली!
भारताने विश्वचषक स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविले होते, असे कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही. १९५०च्या विश्वचषकासाठी भारतीय संघ मुख्य फेरीकरिता पात्र ठरला होता. मात्र आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या नियमानुसार असलेले विशेष बूट भारतीय खेळाडूंकडे नव्हते (त्यावेळी भारतीय खेळाडूंना बूट पुरस्कृत करण्यासाठी कोणी वाली भेटला नाही). त्यामुळे भारतीय संघाला मुख्य फेरीतील सामने खेळण्याच्या संधीवर पाणी सोडावे लागले.