गेल्या वर्षी भारताला २०१७मध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क मिळाले. पण गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) पदाधिकाऱ्यांनी भारतातील काही स्टेडियम्सची पाहणी केल्यानंतर भारतातील विश्वचषक स्पर्धेचे आयोजन धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाहणी केलेली आठपैकी तीन स्टेडियम्स ‘फिफा’च्या किमान निकषांमध्ये बसत नसल्याचे समोर आले आहे.
‘फिफा’ने अ-दर्जाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी १०५ बाय ६८ मीटर आकाराचे स्टेडियम असावे, असा निकष आखून दिला आहे. मात्र दिल्लीतील नेहरू स्टेडियम, पुण्यातील बालेवाडी स्टेडियम आणि गुवाहाटीतील इंदिरा गांधी स्टेडियम ही तीन स्टेडियम फिफाच्या निकषामध्ये बसत नाहीत. तसेच नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम आणि कोचीतील नेहरू स्टेडियम आकाराने फारच मोठी आहेत. डी. वाय. पाटील स्टेडियमवर यापूर्वी एकही सामना न झाल्यामुळे या मैदानावर विश्वचषकाचे सामने आयोजित करण्यासाठी फिफा परवानगी देईल का, याबाबत साशंकताच आहे. मुंबई शहराच्या मध्यभागी असलेल्या कूपरेज स्टेडियमचीही फिफाच्या शिष्टमंडळाने पाहणी केली. पण तात्पुरते स्टँड बसवलेले हे स्टेडियम सामन्यांच्या आयोजनासाठी ग्राह्य़ धरणे कठीणच आहे.
कोलकातामधील सॉल्ट लेक स्टेडियमवर कृत्रिम टर्फ बसवण्यात आले असले आणि सरावासाठी पर्यायी कृत्रिम टर्फ असलेले ठिकाण बरेच लांब असले तरी या स्टेडियमला शिष्टमंडळाने हिरवा कंदील दाखवल्याचे समजते. बंगळुरूतील कर्नाटक फुटबॉल असोसिएशनच्या स्टेडियमचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे शिष्टमंडळाने या स्टेडियमची पाहणी केली नाही. या स्टेडियमचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी ३० महिन्यांचा कालावधी लागणार आहे. नुकत्याच झालेल्या लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेसाठी गोव्यातील नेहरू स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले होते. फक्त प्रसारमाध्यम कक्ष आणि वैद्यकीय कक्षात बदल केल्यानंतर हे स्टेडियम आयोजनासाठी सज्ज असणार आहे.

Story img Loader