धुवाँदार पावसात रंगलेल्या उत्साही मुकाबल्यात मेक्सिकोने कॅमेरूनवर १-० अशी मात केली आणि विश्वचषक स्पध्रेचा विजयारंभ केला. ‘फुटबॉलची खरी मजा पावसातच’ या उक्तीचा प्रत्यय या लढतीने दिला. सामना सुरू झाल्यानंतर पावसाचे आगमन झाले आणि निर्धारित वेळेपर्यंत वरुणराजाने सामन्याचा आस्वाद घेण्याचा निर्णय घेतला. ओरिबे पेराल्टाने नोंदवलेला एकमेव गोल मेक्सिकोच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
६१व्या मिनिटाला पेराल्टाने गोल केला, परंतु कॅमेरूनचा गोलरक्षक इतांजेने चेंडू अडवला. मात्र या प्रयत्नांत चेंडूने पुन्हा उसळी घेतली. या उसळीचा पुरेपूर फायदा घेत पेराल्टाने गोल केला आणि मेक्सिकोच्या चाहत्यांच्या जल्लोषाला उधाण आले. १-० आघाडी वाया न घालवण्याचा निर्धार मेक्सिकोने केला, परंतु कॅमेरूनच्या खेळाडूंनी जोरदार टक्कर देत संघर्ष सुरूच ठेवला. सामना संपायला काही मिनिटे असताना कॅमेरूनच्या बेनोइट इकोटोचा गोल करण्याचा जोरदार प्रयत्न मेक्सिकोच्या ओचाओने जबरदस्त झेप लगावत थोपवला.

Story img Loader