वृत्तसंस्था, अल थुमामा : एकीकडे अपेक्षित कामगिरी करणारा पोर्तुगालचा संघ, तर दुसरीकडे धक्कादायक निकाल नोंदवणारा मोरोक्कोचा संघ. या दोन संघांची शुक्रवारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडणार आहे. मोरोक्कोच्या संघाने यंदाच्या स्पर्धेत कोणालाही अपेक्षा नसताना अंतिम आठ संघांच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. साखळी फेरीत गतउपविजेत्या क्रोएशियाला बरोबरीत रोखल्यानंतर मोरोक्कोने बेल्जियम आणि कॅनडावर मात केली. मग उपउपांत्यपूर्व फेरीतील सर्वात धक्कादायक निकाल नोंदवताना मोरोक्कोने माजी विजेत्या स्पेनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-० असा पराभव केला. त्यामुळे मोरोक्कोच्या संघाला कमी लेखण्याची चूक पोर्तुगाल करणार नाही. मोरोक्कोच्या यशात गोलरक्षक यासिन बोनो, बचावपटू अश्रफ हकिमी आणि अनुभवी आक्रमकपटू हकिम झियेशची भूमिका महत्त्वाची आहे. बोनोने स्पेनविरुद्ध शूटआऊटमध्ये दोन पेनल्टी अडवल्या होत्या. झियेशमध्ये गोल मारण्याची आणि इतरांसाठी गोलच्या संधी निर्माण करण्याची क्षमता आहे.
दुसरीकडे, पोर्तुगालच्या संघाने साखळी फेरीत घाना आणि उरुग्वेवर मात केली होती. त्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालने स्वित्र्झलडचा ६-१ असा धुव्वा उडवला. या सामन्यासाठी अंतिम ११ खेळाडूंमधून कर्णधार आणि तारांकित आघाडीपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला वगळण्यात आले होते. त्याच्या जागी संधी देण्यात आलेल्या गोन्सालो रामोसने हॅटट्रिक नोंदवत सर्वाचे लक्ष वेधले. त्यामुळे मोरोक्कोविरुद्धही रोनाल्डोला सुरुवातीला संघाबाहेर बसावे लागू शकेल. ब्रुनो फर्नाडेसच्या कामगिरीवरही सर्वाचे लक्ष असेल. त्याचे योगदान पोर्तुगालसाठी निर्णायक ठरू शकेल.
संभाव्य संघ
७ पोर्तुगाल : डिओगो कोस्टा; डिओगो डालोट, पेपे, रुबेन डियाज, राफेल गरेरो; ओटाव्हिओ, विल्यम कार्वालिओ, बर्नाडरे सिल्वा; ब्रुनो फर्नाडेस, गोन्सालो रामोस, जाओ फेलिक्स
- संघाची रचना : (४-३-३)
संभाव्य संघ
७ मोरोक्को : यासिन बोनो; अश्रफ हकिमी, नायेफ अगुएर्ड, रोमान साइस, नॉसेर माझरावी; अझेदिन ओनाही, सोफयान अमराबात, सेलिम अमाल्ला; हकिम झियेश, युसेफ एन-नासरी, सोफिएन बोफाल
- संघाची रचना : (४-३-३)
- वेळ : रात्री ८.३० वाजता
- थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, १ एचडी, स्पोर्ट्स १८ खेल, जिओ सिनेमा