विश्वचषकाचे आयोजन आणि या स्पर्धेतील दमदार प्रदर्शन या दोन्ही आघाडय़ांवर ब्राझील चाहत्यांचा विश्वास सार्थ ठरवील, असा विश्वास ज्येष्ठ फुटबॉलपटू पेले यांनी व्यक्त केला. ब्राझीलच्या भूमीवर होणारा विश्वचषक चाहत्यांसाठी संस्मरणीय असेल आणि आणि ल्युईझ फेलिपे स्कोलरी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा ब्राझीलचा संघ यजमानपद समर्थपणे सांभाळेल, असे त्यांनी पुढे सांगितले.
 विश्वचषकाचे आयोजन होणाऱ्या १२ स्टेडियम्सचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याच्या बातम्यांनी ब्राझीलच्या विश्वचषकाचे आयोजनाबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. गेल्या वर्षी झालेल्या कॉन्फडरेशन चषकाला हिंसक आंदोलनाचे गालबोट लागले होते परंतु या नकारात्मक गोष्टी बाजूला सारत ब्राझील विश्वचषकाचे योग्य आयोजन करेल, असे पेले यांनी सांगितले. ही आम्हाला मिळालेली सुवर्णसंधी आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेचे सुयोग्य आयोजन करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत हे दाखवण्याची ब्राझीलला सर्वोत्तम संधी आहे. कॉन्फडरेशन चषकाच्या आयोजनामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आहे. विश्वचषकाद्वारे निधी उभारण्याची, पर्यटनाला चालना देण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. हिंसक आंदोलने पुन्हा होऊ नयेत यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत. ब्राझीलने १९५८, १९६२ आणि १९७० मध्ये विश्वचषक पटकावला  होता.