अल रायन : कर्णधार रॉबर्ट लेवांडोवस्कीच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर पोलंडने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी सौदी अरेबियाचा २-० असा पराभव केला. या विजयासह पोलंडने बाद फेरी गाठण्याच्या दिशेने पाऊल टाकले. पूर्वार्धात ३९व्या मिनिटाला पीटर झिएलिन्स्कीने पोलंडला आघाडीवर नेले. त्यानंतर उत्तरार्धात लेवांडोवस्कीने ८२व्या मिनिटाला पोलंडची आघाडी भक्कम केली. लेवांडोवस्कीचा हा विश्वचषक स्पर्धामधील पहिला गोल ठरला.
पहिल्या सामन्यातील बरोबरीनंतर या विजयाने पोलंड क-गटातून आघाडीवर आले आहेत. सौदी अरेबियाने पहिल्या सामन्यात अर्जेटिनाला धक्का दिल्यामुळे त्यांच्या खेळाकडे सर्वाच्या नजरा होत्या. पोलंडला पहिल्या सामन्यात मेक्सिकोविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे पोलंडसाठीही हा सामना तेवढाच महत्त्वाचा होता.
संपूर्ण सामन्यात सौदी अरेबियाच्या खेळाडूंनी चेंडूवर चांगले नियंत्रण राखले होते. तुलनेने पोलंडला चेंडूवर ताबा मिळविण्यात फारसे यश येत नव्हते. मात्र, पोलंडच्या आघाडीच्या फळीने सफाईदार खेळ करताना गोलच्या संधींचा फायदा घेतला. बचावातील चुकाही सौदीला महागात पडल्या. सामन्यात ४-१-४-१ अशा पद्धतीने खेळणाऱ्या सौदी अरेबियाने डावसारी, कानो, नाजेई, शेहरी आणि बुरायकन या आक्रमकांना सातत्याने पुढेच ठेवले. मात्र, त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही.
पहिल्या सत्रात ३९व्या मिळालेली लेवांडोवस्कीच्या पासच्या साहाय्याने झिएलिन्स्कीने पोलंडला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात पोलंडला संधीसाठी ८२व्या मिनिटाची वाट पाहावी लागली. यातही सौदीचा बचावपटू अल मलाकीची चूक जास्त कारणीभूत होती. पास आल्यावर चेंडूवर नियंत्रण मिळविण्यात त्याला अपयश आले. त्याच्या जवळच उभ्या असलेल्या अनुभवी लेवांडोवस्कीने चेंडूचा ताबा घेत गोलजाळीच्या अगदी समोरून पोलंडचा दुसरा गोल केला. एकाच सामन्यात गोल आणि गोलसाहाय्य अशी दुहेरी भूमिका बजावणारा लेवांडोवस्की पोलंडचा दुसरा खेळाडू ठरला. लेवांडोवस्कीने ८२व्या मिनिटाला पोलंडचा दुसरा गोल केला. लेवांडोवस्कीचा हा विश्वचषक स्पर्धामधील पहिला गोल ठरला. त्यामुळे जल्लोष करताना तो भावूक झाला.