फिफा फुटबॉल विश्वचषकात ब्राझील आणि क्रोएशिया या संघांमध्ये आज चुरशीचा सामना बघायला मिळाला. या सामना पेनेल्टी शूट आऊटमध्ये गेल्यानंतर ब्राझीलला पराभवाचा सामना करावा लागला. या पराजयामुळे ब्राझील विश्वचषकातून बाहेर पडला आहे. तर क्रोएशियाने हा सामना ४-२ ने जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पेनेल्टी शूट आऊटमध्ये ब्राझीलचा अशा प्रकारे पराभव झाल्याने फुटबॉल विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
खरं तर, उपांत्यपूर्व फेरीतील या सामन्यात निर्धारीत ९० मिनिटांमध्ये ब्राझील अथवा क्रोएशिया अशा कोणत्याच संघाला गोल करता आला नाही. त्यामुळे हा सामना नेमकं कोण जिंकणार? याकडे फुटबॉल चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. निर्धारीत वेळ संपल्यानंतर वाढवून दिलेल्या वेळेत दोन्ही संघाकडून आक्रमक खेळ करण्यात आला.
यामध्ये १०६ व्या मिनिटाला ब्राझीलच्या नेमारने जबरदस्त गोल करत १-० ने आघाडी घेतली. त्यामुळे हा सामना ब्राझीलचं जिंकेल, अशी आशा फुटबॉल चाहत्यांना होती. पण क्रोएशियाने ११६ व्या मिनिटाला गोल करत सामना बरोबरीत आणला. त्यानंतर हा सामना पेनेल्टी शूट आऊटमध्ये गेला. पेनेल्टी शूट आऊटमध्ये क्रोएशियाने बाजी मारत ब्राझीलला जोरदार धक्का दिला. पेनेल्टी शूट आऊटमध्ये ब्राझीलची पहिली कीक क्रोएशियाचा गोलरक्षक लिवाकोविचने अडवले. तर चौथी कीक गोलपोस्टला लागून बाहेर गेली. क्रोएशियाच्या खेळाडूंनी आपले चारही कीक अचूक मारले आणि संघाला उपांत्य फेरीत नेले.