फुटबॉल विश्वचषकाचे वेळापत्रक जेव्हा जाहीर झाले तेव्हापासून विजेता कोण ठरेल, अशा भाकितांना क्रीडा पंडितांपासून ते साध्या चाहत्यांकडून सुरुवात झाली आहे. यामध्ये आता यजमान ब्राझीलचे प्रशिक्षक लुईस फेलिपे स्कोलारी यांनी उडी घेतली असून, अंतिम फेरीत आमच्या संघापुढे अर्जेटिनाचे आव्हान असू शकते, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले आहे.
गुरुवारी स्कोलारी आणि त्याच्या संघांने स्पर्धेचे विश्लेषण केले आहे. या विश्लेषणानुसार दक्षिण अमेरिकेतले हे दोन्ही संघ १३ जुलैला अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले जातील, असा त्यांनी निष्कर्ष काढला आहे.
‘‘आम्ही केलेला अभ्यास आणि विश्लेषण असे सांगते की, यंदाची अंतिम फेरी ही दक्षिण अमेरिकेतील दोन बलाढय़ संघांमध्ये होणार आहे. ब्राझीलचा संघ एका बाजूने अंतिम फेरीत येईल, तर दुसऱ्या बाजूने अर्जेटिनाचा संघ येईल. त्यामुळे यंदाच्या अंतिम फेरीत दमदार खेळ पाहायला मिळू शकेल,’’ असे स्कोलारी यांनी सांगितले.
विश्वचषकानंतर लॅम्पार्ड निवृत्त होणार
इंग्लंडचा मध्यरक्षक फ्रँक लॅम्पार्डने विश्वचषकानंतर निवृत्ती होणार असल्याचे निश्चित केले आहे. माजी व्यवस्थापक जोस मॉरिन्हो यांनी यासंदर्भात माहिती दिली. ३५ वर्षीय लॅम्पार्डला चेल्सी क्लबने आपल्या संघातून मुक्त केले. क्लब स्तरावर खेळण्याचे संकेत लॅम्पार्डने दिले आहेत, मात्र आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्त होण्याची वेळ आली असल्याचे लॅम्पार्डने म्हटले आहे. शंभरहून अधिक सामन्यात खेळायची संधी मिळणे अद्भुत आहे. चाळीसाव्या वर्षांपर्यंत खेळायला मी गोलरक्षक नाही, असे लॅम्पार्डने सांगितले.
सर्व सुरळीत होईल -फिफा
विविध प्रश्नांनी सध्या ब्राझीलला ग्रासले आहे. मात्र तरी घाबरण्याचे कारण नाही, सर्व सुरळीत होईल, असा विश्वास फिफाने व्यक्त केला. सर्व गोष्टी नियंत्रणात असून, स्पर्धा निर्धोकपणे होण्यासाठी जे काही करावे लागेल त्याची सर्वतोपरी तयारी झाल्याचे फिफाने स्पष्ट केले. संप, बंद, आंदोलने या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करीत असल्याचे फिफाचे महासचिव जेरोम व्हाल्के यांनी सांगितले.
फ्रँक रिबरी दुखापतग्रस्त
फ्रान्सच्या विश्वचषक अभियानाला जबरदस्त धक्का बसला आहे. प्रमुख खेळाडू फ्रँक रिबरी पाठीच्या दुखण्यामुळे विश्वचषकात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रिबरी यांच्यासह आक्रमक मध्यरक्षक क्लेमंट ग्रेइनरही दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याचे फ्रान्सचे प्रशिक्षक डिडिदर देसचॅम्प्स यांनी सांगितले. स्टीव्ह मंडडा यानेही दुखापतीमुळेही माघार घेतली आहे.