फिफा विश्वचषकाचा महासंग्राम अवघ्या काही आठवडय़ांवर येऊन ठेपला असला तरी सामन्यांच्या तिकिटांना जोरदार मागणी आहे. अखेरच्या टप्प्यात ५४ सामन्यांसाठीची १ लाख ९९ हजार ५१९ तिकिटे विक्रीस ठेवण्यात आली होती. त्यापैकी १ लाख २६ हजार ८३७ तिकिटे अवघ्या चार तासांत विकली गेली. यजमान ब्राझीलने त्यापैकी दोन तृतीयांश तिकिटे मिळवली आहेत.
‘‘फिफाच्या संकेतस्थळाद्वारे यजमान देशातील नागरिकांसाठी ४६ हजार ३४१ तिकिटे ठेवण्यात आली आहेत. शुक्रवारपासून ब्राझीलमधील १२ केंद्रांमध्ये या तिकीटविक्रीला सुरुवात होणार आहे. ब्राझिलिया आणि पोटरे अलेग्रे या ठिकाणच्या तिकीटविक्रीला पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे.’’ तिकिटे मिळवलेल्या चाहत्यांनी फिफाच्या संकेतस्थळावर ती हस्तगत करण्यासाठी भेट निश्चित करण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे. १ जूनपासून १३ जुलैपर्यंत ब्राझीलमधील फिफाच्या तिकीटविक्री केंद्रांमध्ये जाऊनही चाहत्यांना तिकिटे मिळवता येणार आहेत. ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यात होणारा सलामीचा सामना तसेच १३ जुलै रोजी होणारा अंतिम सामना यासह एकूण १० सामन्यांची सर्व तिकिटे विकली गेली आहेत.

Story img Loader