मोरोक्कोचा पोर्तुगालला धक्का 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीटीआय, दोहा : पोर्तुगालचा तारांकित आघाडीपटू आणि कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न पुन्हा अधुरेच राहिले. शनिवारी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मोरोक्कोने पोर्तुगालला १-० असा पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणारा पहिला अरब आणि दुसरा आशियाई देश ठरण्याचा मानही मोरोक्कोने मिळवला.

मोरोक्कोने सांघिक कामगिरी, शिस्तबद्ध खेळ आणि जिद्दीच्या जोरावर यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक आगेकूच केली आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत स्पेनला पराभूत केल्यानंतर मोरोक्कोने उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालला नमवण्याची किमया साधली. पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नाडो सँटोस यांनी या सामन्यातही रोनाल्डोला अंतिम ११मध्ये सुरुवातीपासून स्थान दिले नाही. पूर्वार्धात पोर्तुगालने चेंडूवर नियंत्रण ठेवले. त्यांना गोलच्या संधी मिळाल्या, पण त्याचा फायदा घेण्यात ते अपयशी ठरले. याउलट भक्कम बचाव आणि प्रतिआक्रमणावर भर देणाऱ्या मोरोक्कोने ४२व्या मिनिटाला अनपेक्षित आघाडी मिळवली. आघाडीपटू युसेफ एन-नेसरीने हवेत उंच झेप घेत हेडरच्या साहाय्याने अप्रतिम गोल केला.

उत्तरार्धात पोर्तुगालच्या प्रशिक्षकांनी रोनाल्डोला मैदानावर उतरवले. ८३व्या मिनिटाला रोनाल्डोच्या पासवर जाओ फेलिक्सने गोलकक्षाबाहेरून जोरदार फटका मारला, पण मोरोक्कोचा गोलरक्षक यासिन बोनोने फेलिक्सने मारलेला फटका उत्कृष्टरित्या अडवला. तसेच ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेत रोनाल्डोने केलेला गोलचा प्रयत्न बोनोने हाणून पाडताना मोरोक्कोचा विजय सुनिश्चित केला.

शूटआऊटमध्ये नेदरलँड्सला नमवत अर्जेटिना उपांत्य फेरीत

दोन्ही संघांतील खेळाडूंच्या अति-आक्रमक खेळानंतरही अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक झालेल्या सामन्यात गोलरक्षक एमिलिआनो मार्टिनेझच्या अप्रतिम कामगिरीच्या बळावर अर्जेटिनाने नेदरलँड्सचा शूटआऊटमध्ये ४-३ असा पराभव करत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.  गोलरक्षक मार्टिनेझची पूर्ण सामन्यात अभावानेच कसोटी लागली. मात्र, शूटआऊटमध्ये त्याने निर्णायक भूमिका बजावली. त्यापूर्वी नियमित वेळेत नाहुएल मोलिना (३५व्या मिनिटाला) व कर्णधार लिओनेल मेसी (७३व्या मि.) यांनी केलेल्या गोलमुळे अर्जेटिनाने सामन्यात २-० अशी भक्कम आघाडी मिळविली होती. मात्र, बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या वॉट वेगहॉस्र्टने ८३व्या आणि ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेतील ११व्या मिनिटाला गोल करून नेदरलँड्सला रोमहर्षक बरोबरी साधून दिली होती.    

लुसेल मैदानावर उपस्थित ८८ हजार २३५ पैकी बहुतांश चाहत्यांचा पाठिंबा मेसी आणि अर्जेटिना संघाला मिळत होता. त्यामुळेच अखेरच्या मिनिटातील वेगहॉस्र्टच्या गोलने सर्व मैदानाला स्तब्ध केले. मात्र, गोलरक्षक मार्टिनेझने प्रेक्षकांना आपल्या कामगिरीने पुन्हा एकदा जल्लोष करण्याची संधी मिळवून दिली. नेदरलँड्सचा कर्णधार व्हर्जिल व्हॅन डाइकचा पहिलाच प्रयत्न मार्टिनेझने फोल ठरवला. त्यानंतर आपल्या डावीकडे झेपावत मार्टिनेझने स्टिव्हन बर्गहॉइसची किक अडवली. अर्जेटिनाकडून पाचपैकी चार खेळाडूंनी पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतरण केले, तर नेदरलँड्सच्या पाचपैकी तीन खेळाडूंना चेंडू गोलजाळय़ात मारता आला.

अ‍ॅन्जेल डी मारियाला राखीव खेळाडूंत बसवल्यामुळे मेसीवरच अर्जेटिनाच्या आक्रमणाची भिस्त होती. मेसीने आपल्या कौशल्याच्या व अनुभवाच्या जोरावर अर्जेटिनाचे वर्चस्व राखले होते. मेसीनेच निर्माण केलेल्या चालीवर निर्माण झालेली संधी मोलिनाने ३५व्या मिनिटाला सार्थकी लावली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात नेदरलँड्सच्या खेळाडूंनी गोलकक्षात अर्जेटिनाच्या अकुन्याला पाडले. परिणामी अर्जेटिनाला पेनल्टी मिळाली आणि मेसीने यावर गोल केला. विश्वचषक स्पर्धेच्या कारकीर्दीतील हा मेसीचा दहावा गोल ठरला. 

सामन्याच्या अखेरच्या दहा मिनिटांत मात्र नेदरलँड्सने आक्रमणाची गती वाढवली. याचा फायदा त्यांना ८३व्या मिनिटाला मिळाला. वेगहॉस्र्टने सुरेख हेडर मारत नेदरलँड्सचा पहिला गोल केला. सामन्यात नेदरलँड्सकडून गोलपोस्टच्या दिशेने हा पहिलाच प्रयत्न होता. त्यानंतर भरपाई वेळेतील अखेरच्या मिनिटाला मिळालेली फ्री-किक नेदरलँड्सने कल्पकतेने सार्थकी लावली. कूपमेईनर्सने मैदानालगत किक मारली. त्यावर वेगहॉस्र्टने गोल करून नेदरलँड्सला बरोबरी साधून दिली. अर्जेटिनाच्या फर्नाडेझने अतिरिक्त वेळेतील भरपाई वेळेत मारलेली किक नेदरलँड्सच्या गोलपोस्टला लागून बाहेर गेली.

सामन्यात १८ पिवळी कार्ड

अर्जेटिना आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना सर्वाधिक आक्रस्ताळी ठरला. चेंडूवरील नियंत्रणापेक्षा प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना पाडण्याकडेच खेळाडूंचा अधिक कल होता. या सामन्यात पंचांनी एकूण १८ वेळा पिवळे कार्ड दाखवले. अर्जेटिनाचे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कलोनी आणि साहाय्यक वॉल्टर सॅम्युएल यांनाही बेशिस्त वागणुकीमुळे पिवळे कार्ड मिळाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup tournament argentina reach the semi finals ysh
Show comments