जगज्जेतेपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी जर्मनीला तब्बल २४ वर्षे लागली. ब्राझीलमध्ये जर्मनीने विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करताना जर्मनीच्या खेळाडूंनी चक्क चषकाचे नुकसान केले आहे. चषकावरील एक सोन्याचा तुकडा पडल्याचा खुलासा जर्मन फुटबॉल असोसिएशनने केला आहे. मायदेशात परतल्यानंतर चाहत्यांना हा चषक उंचावून दाखवत असताना चषकाचे नुकसान झाले आहे, असे असोसिएशनचे अध्यक्ष वोल्फगँग निएर्सबॅच यांनी सांगितले. ‘‘कोणत्या खेळाडूकडून चषकाचे नुकसान झाले, याबाबत आम्ही चौकशी केली. पण कोणताही पुरावा आम्हाला मिळाला नाही. मात्र हा तुकडा चषकावर व्यवस्थित लावण्यासाठी आमच्याकडे तज्ज्ञमंडळी आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही,’’ असेही त्यांनी सांगितले. बर्लिनमध्ये परतल्यानंतर खुल्या बसमधून जल्लोष साजरा करताना खेळाडूंकडे विश्वचषकाची प्रतिकृती देण्यात आली होती. विजेतेपदाचा आनंद साजरा करताना चषकाचे नुकसान झाल्याची ही पहिली वेळ नाही. याआधी २०११मध्ये कोपा डेल रे चषक जिंकल्यानंतर रिअल माद्रिदच्या सर्जिओ रामोसच्या हातातून चषक बसच्या खाली पडला होता. त्यानंतर तो चषक बसच्या चाकांखाली सापडला होता. २०१२मध्ये चॅम्पियन्स लीग जेतेपदाच्या आनंदात चषकाचे नुकसान केल्यामुळे चेल्सीच्या तीन खेळाडूंना निलंबित करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा