विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहोचण्यासाठी इटली, उरुग्वेचे अस्तित्व पणाला.. विजयी संघाची आगेकूच.. उरुग्वेला विजय आवश्यक.. दोन्ही संघांचे हल्ले-प्रतिहल्ले.. पण ८०व्या मिनिटापर्यंत गोलशून्य बरोबरी.. अखेर दिएगो गॉडिन उरुग्वेला पावला. गॉडिनच्या निर्णायक गोलाच्या बळावर उरुग्वेने इटलीवर १-० असा निसटता विजय मिळवला आणि फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीतील स्थान निश्चित केले. ‘ड’ गटातून मात्र इंग्लंडपाठोपाठ इटलीलाही पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला.
ग्रीस पहिल्यांदाच बाद फेरीत, आयव्हरी कोस्टवर मात
फिफा विश्वचषकात इटली आणि उरुग्वे संघ दोन वेळा भिडले होते. पहिला सामना बरोबरीत आणि दुसऱ्या सामन्यात इटलीने २-० असा विजय मिळवल्यामुळे इटलीचे पारडे जड मानले जात होते. सामन्याची सुरुवातही थरारक झाली. ११व्या मिनिटाला मार्टिन कॅसेरसने मारिओ बालोटेलीला पाडल्याप्रकरणी इटलीला फ्री-किक मिळाली. पण त्यावर आंद्रिया पिलरेने मारलेला फटका गोलबारच्या वरून गेला. २२व्या मिनिटाला बालोटेलीला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. ३३व्या मिनिटाला उरुग्वेच्या लुइस सुआरेझला गोल करण्याची सुरेख संधी होती. मॅक्सी परेराच्या पासवर सुआरेझने मारलेला फटका इटलीचा गोलरक्षक गिआनलुइगी बफनने अडवला. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला लिओनाड्रो बोनूक्कीने गोलक्षेत्रात उरुग्वेच्या एडिन्सन कावानीला एका हाताने पकडल्याप्रकरणी पेनल्टी-किकची मागणी करण्यात आली. मात्र मेक्सिकोचे प्रशिक्षक मार्को रॉड्रिगेझ यांनी ती धुडकावून लावली.
विजयाविनाच इंग्लंड माघारी
५९व्या मिनिटाला चेंडूवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात उरुग्वेच्या इजिडिओ अरेवालेलोला पायाने टक्कर दिल्यामुळे इटलीच्या क्लॉडियो मार्चिसियोला रेफ्रींनी लाल कार्ड दाखवले. त्यानंतर उरुग्वेने जोरदार आक्रमणे केली. ६६व्या मिनिटाला कावानीच्या पासवर सुआरेझने मारलेला जोरदार फटका बफनने अडवला. गोल न झाल्यामुळे हताश झालेल्या सुआरेझने जॉर्जियो चिएलिनीच्या खांद्यावर चावा घेतला. ७९व्या मिनिटाला सुआरेझचा आणखी एक प्रयत्न बफनने हाणून पाडला. पण त्याच वेळी मिळालेल्या कॉर्नरवर उरुग्वेचा कर्णधार दिएगो गॉडिनने हेडरद्वारे अप्रतिम गोल करत उरुग्वेचे खाते खोलले. याच गोलाच्या बळावर उरुग्वेने अंतिम १६ जणांमध्ये धडक मारली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा