अमेरिका म्हटले की बरेच काही डोळ्यापुढे येते, व्हाइट हाऊस, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपासून ते त्यांनी ऑलिम्पिकमध्ये केलेल्या पदकांच्या लुटीपर्यंत सारेकाही तरळून जाते, पण यामध्ये फुटबॉल कुठेच जास्त दिसत नाही. अमेरिकेने बऱ्याच खेळांमध्ये मोठी मजल मारली असली तरी त्यांना फुटबॉलमध्ये मोठे यश मिळवता आलेले नाही. १८८५ साली अमेरिकेमध्ये फुटबॉलला सुरुवात झाली. विश्वचषकात पहिल्यांदा अमेरिका १९३० साली खेळायला उतरली. या स्पर्धेत दमदार कामगिरी करत त्यांनी उपांत्य फेरीसह तिसरे स्थान गाठले. पण त्यानंतर मात्र जी संघाच्या कामगिरीला उतरती कळा लागली, ती आजतागायत कायम आहे. कारण आतापर्यंत अमेरिकेला १९३०नंतर एकदाही तिसऱ्या स्थानापर्यंत पोहोचता आलेले नाही आणि या विश्वचषकात त्यांची कामगिरी सुधारण्याची सुतराम शक्यताही वाटत नाही.
जुर्गेन क्लिन्समन हे एक माजी खेळाडू तर होतेच, पण २००६ साली त्यांनी जर्मनीचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. त्यांनी अमेरिकेच्या प्रशिक्षकपदाचा पदभार स्वीकारल्यापासून संघाने चांगले यश मिळवले आहे. क्लिन्समन यांच्याकडे परिस्थितीनुसार खेळ बदलण्याचा अनुभव आहे, पण खेळाडूंना तो अमलात आणायला हवा. क्लिन्समन यांचा जर्मनीच्या संघाचा चांगलाच अभ्यास आहे. पण दुसरीकडे त्यांची मानसिकताही जर्मनीच्या संघाला चांगलीच माहिती असणार. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात अमेरिकेचा कडवा सामना जर्मनीशी होणार आहे. एकीकडे जर्मनी आणि दुसरीकडे पोर्तुगालचा संघ त्यांच्या गटामध्ये असल्याने अमेरिकेला जबरदस्त कंबर कसावी लागेल. घानाविरुद्ध अमेरिकेने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असली तरी त्यांना निष्काळजी राहून चालणार नाही.
मायकल ब्रॅडली, जॉन ब्रुक्स आणि क्लिंट डेम्पसी या त्रिमूर्तीवर संघाची कामगिरी अवलंबून असेल. या तिघांमध्ये चांगला समन्वय झाल्यास अमेरिकेचा संघ नक्कीच चांगली कामगिरी करू शकतो. गेल्या दोन वर्षांत अमेरिकेने आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे. त्यामुळे अमेरिका जरी महासत्ता म्हणून ओळखली जात असली तरी फिफा विश्वचषकात त्यांच्याकडून माफक अपेक्षा करण्यात येत आहेत.
अमेरिका  (ग-गट)
फिफा क्रमवारीतील स्थान : १४
विश्वचषकातील कामगिरी
*  सहभाग : १० वेळा (२०१४सह)
*  तिसरे स्थान : १९३०
संभाव्य संघ
* गोलरक्षक : ब्रॅड गुझान, टिम होवर्ड, निक रिमांडो. बचाव फळी : डामार्कस बेस्ले, मॅट बेस्लर, जॉन ब्रुक्स, जेफ कॅमेरून, टिमी चांल्डर, ओमार गोन्झालेझ, फॅबियन जॉन्सन, डीअँड्रे येडलिन. मधली फळी : कायले ब्रेकरमन, अलेजांड्रो बेडोया, मायकल ब्रॅडली, ब्रॅड डेव्हिस, मिक्स डिस्केरूड, ज्युलियन ग्रीन, जेरमिन जोन्स, ग्रॅहम झुसी. आघाडीवीर : जोझी अलटिडोरे, क्लिंट डेम्पसी, अरोन जोहान्सन, ख्रिस वोन्डोटोवस्की.
*  स्टार खेळाडू : मायकल ब्रॅडली, जॉन ब्रुक्स आणि क्लिंट डेम्पसी
*  व्यूहरचना :  ४-२-३-१, ४-५-१ किंवा ४-३-३.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

* प्रशिक्षक :
जुर्गेन क्लिन्समन.

बलस्थाने आणि कच्चे दुवे
मधली फळी हे अमेरिकेचे बलस्थान आहे. त्यामुळे आक्रमण किंवा बचाव करताना मधल्या फळीतील खेळाडूंची भूमिका फार मोलाची ठरणार आहे. त्याचबरोबर प्रशिक्षकांनी परिस्थितीनुसार संघाच्या रणनीतीमध्ये कसे बदल करायला हवे, हेदेखील ठरवले आहे. त्यामुळे जर संघाला जोरदार आक्रमण किंवा अभेद्य बचाव करण्याची वेळ आली तर संघ भांबावून जाणार नाही. पण जर मधल्या फळीला प्रतिस्पर्धी संघाने जर लक्ष्य केले तर अमेरिकेची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्याकडे अव्वल दर्जाचे आघाडीवीर आणि बचावपटू नाहीत. त्यामुळे पोर्तुगाल आणि जर्मनीचा संघ अमेरिकेवर भारी पडू शकतो.

अपेक्षित कामगिरी
यंदाच्या विश्वचषकात सर्वात चुरशीचे सामने ‘ग’ गटामध्ये होऊ शकतात, ‘ग्रुप ऑफ डेथ’ असे या गटाची यापूर्वीच ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे अमेरिकेसाठी नक्कीच या वेळी दुसरी फेरी गाठणे शक्य नसेल. कामगिरी आणि फॉर्मचा विचार केला तर अमेरिकेचा गटामध्ये तिसरा क्रमांक लागतो. कारण पोर्तुगाल आणि जर्मनी हे दोन्ही संघ बलाढय़ आहेत. तर घानाचा संघही कोणत्या क्षणी धक्का देऊ शकतो. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात जर अमेरिकेने दुसरी फेरी गाठली तर त्यांच्यासाठी ही फार मोठी गोष्ट असेल. एकीकडे घानावर ते विजय मिळवतीलही, पण पोर्तुगाल आणि जर्मनी यांच्याविरुद्ध खेळताना मात्र त्यांना सर्वस्व पणाला लावाले लागेल. वास्तव सांगायचे झाल्यास अमेरिका दुसऱ्या फेरीत जाण्याची शक्यता धूसर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup usa team big name