या शतकातील महान फुटबॉलपटू कोण आहे? लिओनेल मेस्सीने या वादाला ब्रेक लावला आहे. अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देऊन, त्याने GOAT वरील दैनंदिन वादविवाद आणि क्रिस्टियानो रोनाल्डोशी तुलना करणे हे एकाच वेळी संपवले. अर्जेंटिनाने २ वेळचा चॅम्पियन फ्रान्सचा पराभव करत फिफा विश्वचषक ट्रॉफी जिंकली. अर्जेंटिनाची ही तिसरी फिफा विश्वचषक ट्रॉफी आहे. याआधी त्याने १९८६ मध्ये या विजेतेपदावर कब्जा केला होता. तेव्हा अर्जेंटिनाचा हिरो दिएगो मॅराडोना होता. यावेळी लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाचा सुपरहिरो असल्याचे सिद्ध झाले.
लिओनेल मेस्सीने विश्वचषक विजयाचे स्वप्न पूर्ण केले अन् गेली दशकं सुरू असलेल्या GOAT ( ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम) या चर्चेलाही पूर्णविराम लागला. मेस्सी की ख्रिस्तियानो रोनाल्डो यात GOAT कोण ही चर्चा आपण गेली दहाऐक वर्ष ऐकतोय आणि यंदाची फुटबॉल फिफा विश्वचषक स्पर्धा ही दोन्ही महान खेळाडूंसाठी अखेरची असल्याने त्याचा फैसला कतारमध्येच होईल अशी अपेक्षा होती. अखेर ते झाले अन् मेस्सीने बाजी मारली. मेस्सीने विश्वचषक विजयानंतर कट्टर प्रतिस्पर्धी रोनाल्डोला आणखी एक धक्का दिला.
फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना रविवार, १८ डिसेंबर रोजी कतारमध्ये खेळला गेला. यामध्ये दोन वेळचा चॅम्पियन फ्रान्सचा सामना अर्जेंटिनाशी झाला. २०१८ मध्येही फ्रान्सने विजेतेपद पटकावले होते. अशाप्रकारे त्याला सलग दोनदा विजेतेपद पटकावण्याची संधी होती. मात्र, लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने फ्रान्सचे हे स्वप्न भंगले. या विजयासह अर्जेंटिनाची वर्ल्डकप ट्रॉफी जिंकण्याची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. त्याचवेळी या शतकातील महान फुटबॉलपटू कोण, या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला.
अर्जेंटिनाचा कट्टर विरोधक असलेल्या इंग्लंडच्या गॅरी लिनकरसह अनेक दिग्गजांनी GOAT वरील वादविवाद त्याच दिवशी समाप्त झाला असे मान्य केले होते, ज्या दिवशी लिओनेल मेस्सीचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू कोण आहे? या चर्चेला पूर्णविराम देत गॅरी लिनकर यांनी ट्विट केले की, “अजून काही वाद बाकी आहे का? तरीही कोणाला GOAT बद्दल विचारायचे असेल तर प्रश्न विचारू शकतात.
लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी २००० च्या दशकाच्या सुरुवातीपासून फुटबॉल जगतावर वर्चस्व गाजवले आहे. या दोघांमध्ये केवळ मैदानावरच नाही तर बाहेरही रस्सीखेच सुरु आहे. मेस्सी आणि रोनाल्डोचे चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूला ग्रेट ऑफ ऑल टाइम म्हणजेच GOAT म्हणत आहेत. पैसा आणि प्रसिद्धीच्या बाबतीत दोघेही जवळपास आहेत. मात्र विश्वचषक जिंकून मेस्सीने कामगिरीच्या बाबतीत रोनाल्डोला खूप मागे टाकले आहे.
लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाचा संघ दोनदा फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला. एकदा त्याने विजेतेपद पटकावले आणि एकदा त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर रोनाल्डो त्याच्या राष्ट्रीय संघ पोर्तुगालला एकदाही विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचवू शकला नाही. होय, त्याने आपल्या संघाला युरो चॅम्पियन बनवले आहे.
लिओनेल मेस्सीने फिफा विश्वचषकात एकूण १३ गोल केले आहेत. सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत तो संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहे. मिरोस्लाव क्लोसच्या नावावर सर्वाधिक गोल (१६) करण्याचा विश्वविक्रम आहे. फिफा विश्वचषकात रोनाल्डोने एकूण ८ गोल केले आहेत. सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत तो संयुक्तपणे १७व्या क्रमांकावर आहे. जर आपण पुरस्कारांबद्दल बोलायचे तर लिओनेल मेस्सीने फिफा विश्वचषक स्पर्धेत दोनदा गोल्डन बॉल जिंकला आहे. तर ७ बॅलन डी’ओर पुरस्कारही त्याच्या नावावर आहेत, जो एक विश्वविक्रम आहे. रोनाल्डोने ५ बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकले आहेत. त्याचप्रमाणे मेस्सीने ६ युरोपियन गोल्डन शूज पुरस्कार जिंकले आहेत, तर रोनाल्डोला हा पुरस्कार फक्त ४ वेळा जिंकता आला आहे.