गतविजेत्या स्पेनने विश्वचषकातून जाता जाता अखेर विजयाचा टिळा लावून घेतला. नेदरलँड्स आणि चिलीविरुद्धच्या सामन्यांमध्ये वस्त्रहरण झाल्यानंतर शेवटच्या साखळी सामन्यात दुबळया ऑस्ट्रेलियावर त्यांनी ३-० असा दणदणीत विजय मिळवला. डेव्हिड व्हिला, ज्युआन माटा आणि फर्नाडो टोरेस यांनी प्रत्येकी एक-एक गोल केले.
सामन्याचा पहिला अर्धा तास गोलविरहीत झाला, मग ३६व्या मिनिटाला डेव्हिड व्हिलाने अप्रतिम गोल करत स्पेनचे खाते उघडले. त्यानंतर पहिल्या सत्रामध्ये स्पेनच्या आक्रमणाला आणखी यश मिळाले
नाही.
दुसऱ्या सत्रामध्ये स्पेनच्या आक्रमणाला अधिक धार चढल्याचे दिसून आले. ६९व्या मिनिटाला फर्नाडो टोरेसने दुसरा गोल लगावत स्पेनच्या आघाडीमध्ये भर घातली, त्यानंतर ८२व्या मिनिटाला ज्युआन माटाने तिसरा गोल करत संघाची आघाडी वाढवत विजयावर शिक्कामोर्तब केले.