भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय प्रेक्षकांविरोधात वर्णद्वेषी टीप्पणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. कसोटीच्या चौथ्या दिवशी एजबस्टन येथे सुरु असणाऱ्या सामन्यादरम्यान इंग्लंडच्या काही समर्थकांनी भारतीय चाहत्यावर वर्णद्वेषी टीका करत हुज्जत घातली.

सोशल मीडियावर सोमवार (४ जुलै २०२२ रोजी) सायंकाळी अनेकांनी अशाप्रकारच्या तक्रारी केल्या आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील तक्रारी केल्यात. यामध्ये इंग्लड क्रिकेट बोर्डाला टॅग करुन करण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये सध्या चौकशी सुरु असल्याची माहिती देण्यात आलीय.

सामना पाहण्यासाठी मैदानामध्ये आलेल्या एका प्रेक्षकाने स्टॅण्डमधील फोटो पोस्ट करत, “येथे भारतीय चाहत्यांना वर्णद्वेषी वागणूक दिली जात आहे. ब्लॉक क्रमांक २२ मध्ये हा प्रकार घडलाय. येथील लोक आम्हाला Curry C**ts आणि paki bas**s असं म्हटलं. आम्ही यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करुन त्यांना किमान १० वेळा कोण हे बोललं त्याबद्दलची माहिती दिली. मात्र त्यांनी आम्हाला कोणताही प्रतिसाद न देता जागेवर बसण्यास सांगितलं,” असं भारत आर्मीमधील एका सदस्याने ट्विटरवरुन सांगितलं आहे.



या आरोपांवर यॉर्कशायरचा क्रिकेटपटू अझीम रफिकने हे फार क्लेशदायक आहे असं म्हणत हा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. याच क्रिकेटपटूने मागील वर्षी यॉर्कशायर क्रिकेटमध्ये वर्णद्वेषी वागणूक मिळत असल्याची टीका केल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने नियमांमध्ये मोठे बदल केले होते.

या वादावर एजबस्टन क्रिकेट मैदानाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन रिप्लाय देण्यात आलाय. “आम्हाला हे वाचून फार वाईठ वाटत आहे. आम्ही अशाप्रकारच्या कोणत्याही वर्तवणुकीचं समर्थन करत नाही. आम्ही या प्रकरणात लवकरात लवकर चौकशी करु,” असं येथील प्रशासनाने म्हटलंय.

कुशल मालदे नावाच्या एका भारतीय क्रिकेट चाहत्याने काही इंग्लंडच्या चाहत्यांनी ‘स्मेली पाकी’ असं आपल्याला म्हटल्याचा दावा केलाय. “मला चाहत्यांमधील घोषणाबाजी आवडते. मात्र आज सामन्यादरम्यान आमच्याविरोधात फारच वाईट शब्दांचा वापर करण्यात आला. काही फारच वाईट शब्द (उदा: यू स्मेली पा****) या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी भारतीय चाहत्यांनाच खाली बसण्यास सांगून आक्षेपार्ह विधानं करणाऱ्यांना बडबड सुरु ठेऊ दिली,” असं कुशलने म्हटलंय.

मैदानाचे विशेष कार्यकारी अधिकारी स्टुर्ट कॅन यांनी, “हा प्रकार समजल्यानंतर मला फार वाईट वाटलं असून आम्ही हे मैदान सर्वांसाठी सुरक्षित असावं यासाठी प्रयत्न करत आहोत,” असं सांगितलं. “मी स्वत: हा मुद्दा उपस्थित करणाऱ्या व्यक्तीचे ट्विट्स पाहून त्याच्याशी चर्चा केली. या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून आम्ही नेमकं काय घडलं याची माहिती घेत आहोत,” असंही कॅन म्हणाले. “या मैदानामध्ये कोणालाही अशाप्रकारच्या वर्णद्वेषाचा सामना करावा लागू नये. आमच्याकडे सर्व माहिती आल्यानंतर आम्ही या प्रकरणात कारवाई निश्चित करु,” असं आश्वासन कॅन यांनी दिलं आहे.

भारतीय समर्थकांच्या भारत आर्मीनेही ट्विटरवरुन यासंदर्भातील प्रतिक्रिया देताना, अनेक भारतीय समर्थकांना फार छोट्या गटाने लक्ष्य केल्याचं पहायला मिळालं, असं म्हटलंय.

यावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरुन प्रतिक्रिया देताना तपास सुरु असल्याची माहिती दिलीय.

क्रिकेटमध्ये वर्णद्वेषाला कोणतेही स्थान नाही असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलंय.

Story img Loader