पेनल्टी-शूटआऊटमध्ये ऑलिम्पिक विजेत्यांवर ३-२ अशी सरशी

निर्धारित वेळेत हरमनप्रीत सिंगने केलेल्या चमकदार कामगिरीनंतर भारताने एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये अर्जेंटिनाला २-२ असे बरोबरीत रोखले. त्यानंतर थरारक झालेल्या पेनल्टी-शूटआऊटमध्ये भारताने ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाला ३-२ अशी धूळ चारली.

जवळपास वर्षभरानंतर भारतीय पुरुष हॉकी संघ पहिल्यांदाच मैदानात उतरला. प्रो हॉकी लीगमध्ये शनिवारी मध्यरात्री रंगलेल्या या पहिल्या सामन्यात दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. हरमनप्रीतने २१व्या मिनिटाला गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र मार्टिन फेरेरो याने २८व्या आणि ३०व्या मिनिटाला गोल करत अर्जेंटिनाला सामन्यात पुनरागमन करून दिले. अखेर ६०व्या मिनिटापर्यंत अर्जेंटिनाने ही आघाडी कायम राखली. सामना संपायला अवघ्या काही सेकंदांचा खेळ शिल्लक असताना हरमनप्रीतने मिळालेल्या पेनल्टीकॉर्नरवर शानदार गोल करत हा सामना २-२ असा बरोबरीत सोडवला.

पेनल्टी-शूटआऊटमध्ये निकोलस कीनन आणि लुकास मार्टिनेझ यांनी पहिल्या दोन प्रयत्नांत गोल केले. मात्र त्यानंतर श्रीजेशने शानदार कामगिरी करत लुकास विया, मार्टिन फेरेरो आणि इग्नॅसियो ऑर्टिझ यांचे फटके अडवले. भारताकडून ललित उपाध्याय, रुपिंदरपाल सिंग आणि दिलप्रीत सिंग यांनी गोल केले. पहिल्या प्रयत्नांत हरमनप्रीतला तर चौथ्या प्रयत्नांत शमशेर सिंगला गोल करण्यात अपयश आले.

या विजयामुळे भारताने प्रो हॉकी लीगमध्ये सात सामन्यांत १२ गुणांसह आपले पाचवे स्थान अधिक भक्कम केले. हा सामना बरोबरीत सोडवल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला, पण गोलरक्षक पीआर श्रीजेशने केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे भारताने एका बोनस गुणाची कमाई केली. स्पर्धेच्या नियमानुसार, शूट-आऊटमध्ये विजय मिळवणाऱ्या संघाला बोनस गुण देण्यात येतो. हरमनप्रीतला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. उभय संघांमधील दुसरा सामना रविवारी मध्यरात्री रंगणार आहे.

Story img Loader