ग्रँडस्लॅम स्पर्धा काफिला आता अमेरिकेच्या भूमीत येऊन स्थिरावला आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील ‘हार्ड कोर्ट’, फ्रेंच खुल्या स्पर्धेची लाल माती, विम्बल्डनची हिरवळ असा प्रवास करून वर्षांतल्या शेवटच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी पुन्हा एकदा ‘हार्ड कोर्ट’वर रंगणाऱ्या महा मुकाबल्यासाठी टेनिस विश्व सज्ज झाले आहे. खेळाडूंच्या प्रयत्नांमुळे विजेत्यांना मिळणाऱ्या बक्षीस रकमेत यंदा घसघशीत वाढ करण्यात आली आहे. वर्षांतल्या ग्रँडस्लॅमची आखिरी जंग टेनिस रसिकांसाठी पर्वणीच असेल.
इंग्लंडचा अँडी मरे पहिल्यांदाच गतविजेता या भूमिकेत असणार आहे. इंग्लंडचा ग्रँडस्लॅम जेतेपदांचा दुष्काळ संपवणारा मरे जेतेपद आपल्याकडेच राखण्यासाठी आतुर असेल. सर्व प्रकारच्या फटक्यांवर मिळवलेले प्रभुत्त्व, कोर्टवरचा सर्वागीण वावर, मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्याची हातोटी या सगळ्यामुळे मरेने संभाव्य विजेत्यांच्या मांदियाळीत स्थान पटकावले आहे. फेडरर-नदाल-जोकोव्हिच त्रिकुटाप्रमाणे वर्चस्व सिद्ध करून, ग्रँडस्लॅम जेतेपदांची कमाई करण्यासाठी सकारात्मक असंतुष्टता मरेने जोपासायला हवी. अविरत संघर्षांनंतर मरेच्या पदरात यशाचे दान पडले आहे. यंदाही जेतेपदासाठी मरेसमोर खडतर आव्हान आहे.
गुडघ्याच्या गंभीर दुखापतीतून सावरलेला राफेल नदाल अधिक त्वेषाने खेळत आहे. यावर्षीच्या विम्बल्डन स्पर्धेत त्याला झटपट गाशा गुंडाळावा लागला होता. मात्र त्यानंतर तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रॉजर्स आणि सिनसिनाटी स्पर्धाची जेतेपदे जिंकत अमेरिकन खुल्या स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे नदालने दाखवून दिले आहे. वर्षांतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे जेतेपद नोव्हाक जोकोव्हिचने पटकावले होते. मात्र त्यानंतर जेतेपदाच्या चषकाने त्याला हुलकावणी दिली आहे. उपांत्य फेरी, अंतिम लढत इतक्या जवळ जाऊनही जेतेपदाचा फॉम्र्यूलाजोकोव्हिचला गवसलेला नाही. या स्पर्धेद्वारे लाडक्या हार्डकोर्टवर पुन्हा जेतेपदाचा टिळा माथी लावण्यासाठी जोकोव्हिच प्रयत्नशील आहे.
जेतेपदाच्या शर्यतीपासून दूर झालेल्या, खराब फॉर्मने ग्रासलेल्या, वयापरत्वे हालचाली मंदावलेल्या फेडररला या स्पर्धेसाठी सातवे मानांकन देण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या विम्बल्डननंतर फेडररची ग्रँडस्लॅम जेतेपदांची झोळी रिकामीच असून फेडररलाही हरवता येते हे आता अन्य टेनिसपटूंना कळले आहे. टेनिसला अलविदा करण्यापूर्वी किमान एकदा जुना फेडरर अनुभवायला मिळाला अशी अपेक्षा आहे. जिंकण्यासाठी आसुसलेला, शैलीदार खेळ आणि विनम्र वावराने प्रतिस्पध्र्याला निष्प्रभ करणारा फेडरर वर्षांतल्या शेवटच्या ग्रँडस्लॅमच्या निमित्ताने पाहायला मिळेल अशी आशा आहे.
मारिया शारापोव्हा दुखापतीमुळे तर विम्बल्डन विजेती मारिओन बाटरेली अनपेक्षित निवृत्तीमुळे खेळणार नसल्याने सेरेना विल्यम्सपुढचे आव्हान सोपे झाले आहे. व्हिक्टोरिया अझारेन्का, लि ना, पेट्रा क्विटोव्हा, अॅग्निेझेस्का रडवानस्का यांच्यापैकी कोण सेरेनाची सद्दी रोखू शकते हे पाहणे रंजक ठरणार आहे.
लिएण्डर पेस, महेश भूपती, रोहन बोपण्णा, सानिया मिर्झा आणि सोमदेव देववर्मन यांच्यावर भारताची भिस्त आहे. सोमदेव मुख्य फेरीत किती आगेकूच करतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
parag.phatak@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा