रैना की रहाणे, कोणला मिळणार संधी ?
मोहालीत शिखर धवनने पदार्पणात दाखविलेल्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर भारताने विजयाचे शिखर आरामात सर केले. ‘कांगारू अंडरग्राऊंड इन पीसीए मोहाली’ अशी ऑस्ट्रेलियाच्या संघाची केविलवाणी अवस्था झाली होती. पण ऑस्ट्रेलियाच्या मातीत गतवर्षी भारताने पत्करलेल्या ०-४ अशा पराभवाची परतफेड अजून पूर्ण झालेली नाही. सुडाने पेटलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नवी दिल्लीतील चौथ्या कसोटीत ऑसी संघाला ‘व्हाइट वॉश’ देण्यासाठीच उत्सुक आहे.
१९९३मध्ये मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ग्रॅहम गुचच्या इंग्लिश संघाला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ‘व्हाइट वॉश’ देण्याची किमया साधली होती. पण धोनीसेना आता नवा इतिहास रचण्यासाठी उत्सुक आहे. आपल्या ८१ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने कधीच चार सलग कसोटी सामने जिंकण्याची किमया साधली नव्हती. त्यामुळेच फिरोझशाह कोटला स्टेडियमवर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याकडे साऱ्यांचेच डोळे लागले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या अननुभवी संघाला उरलीसुरली लाज राखण्याचे आव्हान असेल.
परदेशात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात लागोपाठ आठ कसोटी सामने गमावल्यानंतर इंग्लंडच्या संघाने भारताला भारतामध्ये २-१ असे हरवले होते. या पाश्र्वभूमीवर धोनीच्या नेतृत्वावर बरीच टीका झाली होती. कर्णधार बदलण्याची मागणीसुद्धा जोर धरू लागली होती. परंतु आता ऑस्ट्रेलियाला भुईसपाट करून आपली प्रतिमा सुधारण्याची ही चांगली संधी असेल. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अद्यापही भारतीय फिरकीचे चक्रव्यूह भेदू शकलेले नाहीत. या दुष्काळात तेरावा महिना म्हणजे मायकेल क्लार्कबाबत साशंकता कायम आहे. प्रतिष्ठा जपण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ शेवट गोड करण्यासाठी उत्सुक आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे शिखर धवनने घरच्या क्रिकेटरसिकांसमोर आतषबाजी करण्याची संधी गमावली आहे. या परिस्थितीत वारंवार अपयशी ठरणाऱ्या सुरेश रैनाचे नशीब बलवत्तर ठरण्याची शक्यता आहे. ‘धोनीचा लाडका’ असा शिक्का बसलेल्या उत्तर प्रदेशच्या डावखुऱ्या रैनाला कसोटी क्रिकेटमध्ये सिद्ध करण्यासासाठी आणखी एक संधी चालून येईल.
नवी दिल्लीत मुरली विजयसोबत सलामीला कोण उतरणार, हा भारतीय संघासमोरील प्राथमिक प्रश्न आहे. या दृष्टीने मुंबईचा फलंदाज अजिंक्य रहाणेचे कसोटी पदार्पण अपेक्षित आहे. रहाणेचा मधल्या फळीतील फलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. या कारणास्तव त्याची प्रतीक्षा अजून लांबण्याची शक्यता आहे. रहाणेला नाकारण्यात आल्यास चेतेश्वर पुजारा विजयसोबत सलामीला उतरेल, तर विराट कोहली तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करेल. याचप्रमाणे रैना पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल.
सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील हा १९८वा कसोटी सामना आहे. आयसीसीच्या कार्यक्रमांचा अंदाज घेतल्यास पुढील वर्षभर तरी भारतात कसोटी सामने होणार नाहीत. त्यामुळे घरच्या मैदानावर कदाचित सचिनच्या कारकिर्दीतील ही अखेरची कसोटी मालिका असू शकते.
मोहालीत अनुभवी इशांत शर्माच्या साथीने युवा भुवनेश्वर कुमारने टिच्चून गोलंदाजी केली. ‘भुवी’ नव्या चेंडूचा कल्पकतेने वापर करतो, तर इशांत रीव्हर्स स्विंग करण्यात वाकबगार आहे. आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यावर भारताच्या फिरकीची मदार आहे. या परिस्थितीत अनुभवी हरभजन सिंगऐवजी डावखुरा फिरकी गोलंदाज प्रग्यान ओझालाच संधी मिळण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघात शेन वॉटसन परतणार, हे मात्र निश्चित झाले आहे. याचप्रमाणे दुखापतग्रस्त मिचेल स्टार्कचे स्थान जेम्स पॅटिन्सन थेट घेऊ शकेल. पॅटिन्सनसोबत पीटर सिडल वेगवान माऱ्याची धुरा वाहेल. याचप्रमाणे स्टीव्हन स्मिथ, फिल ह्य़ुजेस यांनीही आपल्या कामगिरीद्वारे संघातील स्थान बळकट केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा