प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात गतविजेत्या पाटणा पायरेट्सने विजयाची हॅटट्रीक केली. अंतिम फेरीत गुजरात फॉर्च्युनजाएंट संघावर मात करत पाटण्याने स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. याआधीही तब्बल ३ महिने सुरु असलेल्या या पर्वाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. मिळालेल्या माहितीनूसार प्रो-कबड्डीचा पाचव्या पर्वाचा अंतिम सामना हा भारतात क्रिकेट व्यतिरीक्त पाहिल्या जाणाऱ्या खेळांमधे पहिला ठरला आहे. या सामन्याने पी. व्ही. सिंधू आणि कॅरोलिना मरिन यांच्यातील रिओ ऑलिम्पिकमधील अंतिम सामन्याच्या प्रेक्षकसंख्येचे विक्रमही मोडले आहेत.
स्टार स्पोर्ट्स या वाहिनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वातील अंतिम सामना तब्बल २६ कोटी २० लाख लोकांनी टीव्हीवर पाहिला. सिंधू आणि कॅरोलिना मरीन यांच्यातील सामन्याला, रिओ ऑलिम्पिकदरम्यान १७ कोटी २० लाख इतका प्रेक्षकवर्ग लाभला होता. हैदराबादमध्ये सुरुवात झालेलं प्रो-कबड्डीचं पाचवं पर्व चेन्नईत संपलं. याआधी १२ शहरांमध्ये या स्पर्धेचे सामने खेळवले गेले.
अवश्य वाचा – आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताचा संभाव्य संघ जाहीर, महाराष्ट्राच्या अवघ्या ३ खेळाडूंना संघात स्थान
२०१४ साली प्रो-कबड्डीच्या स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर, भारतात प्रेक्षकांची या स्पर्धेला पसंती मिळायला लागली. प्रत्येक पर्वागणिक प्रो-कबड्डीचे सामने प्रेक्षकसंख्येच्या बाबतीत नवे विक्रम रचायला लागले. महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण भारताततून या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत गेला. अनेक छोट्या शहरांमधून आलेल्या खेळाडूंना प्रो-कबड्डीने नवीन ओळख निर्माण करुन दिली. २०१६ साली भारतात खेळवला गेलेला कबड्डी विश्वचषक, प्रेक्षकसंख्येच्या निकषांत सर्वाधीक पाहिला गेलेला क्रिकेटव्यतिरीक्त खेळ ठरला होता.