२०२२ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीत असलेली टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. त्या मालिकेतील पहिला सामना हा मोहालीतील पीसीए स्टेडियमवर आज होणार आहे. कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघ व्यवस्थापन टी-20 विश्वचषकापूर्वी संघातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतील. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सांयकाळी ७.३० वाजता सुरूवात होणार आहे. तर या सामन्यासाठी वातावरण आणि खेळपट्टी कशी असणार हे आपण जाणून घेऊया.
सामन्यावेळी मोहालीतील हवामान
हा सामना सुरु होण्यापूर्वी पावसाची शक्यता फार कमी आहे. काल पाऊस झाला होता मात्र आज शक्यता कमी आहे. वेदर डॉट कॉमच्या अहवालानुसार, सप्टेंबर २० या दिवशी सकाळी आणि दुपारी तापमान ३२° सेल्सियस असणार आहे. तर दिवसा आणि रात्री आभाळ स्वच्छ असणार आहे. तसेच दिवसा आर्द्रता कमी असणार असून रात्री ते वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दवाचा परिणाम हा नंतर गोलंदाजी करणाऱ्या संघावर होऊ शकतो.
पहिल्या सामन्यासाठी अशी असेल खेळपट्टी
पीसीए स्टेडियमची खेळपट्टी ही मोठी धावसंख्या नोंदवणारी आहे. मोहालीच्या मैदानात आतापर्यंत भारताने बरेच सामने जिंकले आहेत. पण काळानुरुप मोहालीच्या मैदानाची खेळपट्टी बदलली आहे. यापूर्वी मोहालीची खेळपट्टी ही गोलंदाजांसाठी पोषक समजली जायची. पण कालांतराने खेळपट्टीमध्ये बदल झाला आणि आता या खेळपट्टीवर चांगल्या धावाही होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. येथे आंतरराष्ट्रीय टी२० च्या पहिल्या डावाची सरासरी १७७ असून दुसऱ्या डावाची सरासरी १७० आहे. पण तरीही या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळत असते. सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना या खेळपट्टीवर चांगली मदत मिळू शकते.
या स्टेडियममध्ये आतापर्यंत ५ सामने खेळले गेले आहेत. यातील तीन सामने भारताने खेळले असून हे तिन्ही सामने भारतानेच जिंकले आहे. हे तिन्ही सामने भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना जिंकले आहे. याआधी २०१६ साली ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तान विरुद्ध या मैदानावर सामना खेळला होता. मोहालीतील खेळपट्टीवर भारतीय संघाची सर्वोच्च धावसंख्या ही २११ इतकी आहे. पीसीए स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांनी ज्या संघांविरुद्ध टी२० सामने खेळले ते सगळे सामने दोन्ही संघांनी जिंकले आहेत. यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात कोण ठरेल विजेता हे पाहण्याजोगे ठरणार आहे.